Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

समृद्धीवरील अपघातात सहा जणांचा मृत्यूमालवाहू वाहनाच्या धडकेनंतर घडली दुर्घटना

र्धा : समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरूळ गावाजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरच्या दिशेने जाणार्‍या कारला मागून भरधाव आलेल्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर कारला आग लागली.

आगीने काही क्षणांतच संपूर्ण कारला वेढा घातल्याने आत अडकलेल्या चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. धडक देणार्‍या मालवाहू वाहनातील चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये मालवाहू वाहनाचा चालक संजय कुमार (वय 30) आणि वाहक समरजित पाल (वय 24, दोघेही उत्तर प्रदेश) यांच्यासह कारमधील जानवी राजेश टिपले (वय 21), सुषमा राजेश टिपले, राजेश आनंदराव टिपले आणि अंकुश राऊत (सर्व रा. सालोड हिरापूर, जि. वर्धा) यांचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, याच मार्गावर रविवारी रात्री इथेनॉल वाहून नेणारा टँकर पलटल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्गाची एक बाजू बंद करण्यात आली होती. त्यामुळे दुसर्‍या मार्गिकेतून एकेरी वाहतूक सुरू होती. या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेदरम्यान पहाटे मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते पुढे असलेल्या कारवर आदळले आणि भीषण अपघात घडला. धडकेनंतर कारने तात्काळ पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आग इतकी तीव्र होती की चारही प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि बचाव पथकाने आगीवर नियंत्रण मिळवून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली. आगीची तीव्रता मोठी असल्याने कारमधील मृतदेह गंभीररीत्या जळाले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख निश्‍चित करण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान उभे राहिले आहे.

The post समृद्धीवरील अपघातात सहा जणांचा मृत्यूमालवाहू वाहनाच्या धडकेनंतर घडली दुर्घटना appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan