महाराष्ट्र
शेअर बाजाराने ओलांडला 50 हजारांचा टप्पा

मुंबई : शेअर बाजाराचा सेन्सेक्सने गुरुवारी इतिहासात पहिल्यांदाच 50 हजारांचा टप्पा ओलांडला. सकाळी बाजाराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काह...
मुंबई : शेअर बाजाराचा सेन्सेक्सने गुरुवारी इतिहासात पहिल्यांदाच 50 हजारांचा टप्पा ओलांडला. सकाळी बाजाराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच शेअर बाजाराने उसळी खात 50 हजारांचा टप्पा ओलांडला. निर्देशांकाने 40 हजारांवरुन 50 हजारांपर्यंतचा टप्पा ओलांडण्यासाठी बीएसईला 3 महिन्यांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे अवघ्या 9 सत्रांमध्ये सेन्सेक्सने एक हजार अंकाची उसळी घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14,700 पर्यंत उंचावला. शेअर बाजाराने 50 हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी या क्षेत्रातील जाणकारांनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठे चढ-उतार पहायला मिळू शकतात.
आज,गुरुवारी सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सेस बँक यासारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्याप्रमाणात खरेदी करण्यात आली. एस अॅण्ड पी बीसीएसई मीडकॅप इंडेक्सने 132 अंकांनी उसळी घेत 19 हजार 288 चा टप्पा गाठला. तर बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 126.86 अंशांनी वधारला आणि 18 हजार 870 पर्यंत गेला. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीपेक्षा यंदा बाजारातील वातावरण अधिक सकारात्मक असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाची लस, जागतिक बाजारपेठेतील आशादायक चित्र या साऱ्याचा बाजारावर सकारात्कम परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.