Dailyhunt
शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची कारवाई; 1.26 कोटींचे दोन कॅप्सूल टँकर जप्त

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची कारवाई; 1.26 कोटींचे दोन कॅप्सूल टँकर जप्त

मुंबई : शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. 2 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक चक43 घ 5921 व चक43 उघ 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे 17,590 किलो व 17,630 किलो एलपीजी गॅस साठवलेला होता. याशिवाय घटनास्थळावरून 19.2 किलो क्षमतेचे 17 भरलेले व 6 रिकामे सिलेंडर, 14.2 किलोचा 1 भरलेला सिलेंडर तसेच 5 किलोचे 2 भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण 35,220 किलो एलपीजी गॅस, 2 टँकर आणि 26 सिलेंडर असा सुमारे 1 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे 2480 कुटुंबांची गरज भागू शकली असती. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan