Friday, 13 Dec, 12.40 pm लोकमंथन

क्रीडा
टी-20 मालिकेत भारताचाच वरचष्मा

वेस्ट इंडिजवर 68 धावांनी मात करत, मालिकाविजय


मुंबई
केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर भारताने विंडीजला येथील तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीत 68 धावांनी चीत केले आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत मालिकाविजयावर कब्जा केला. प्रारंभी भारताने निर्धारित 20 षटकात 3 बाद 240 धावांचा डोंगर रचला व नंतर विंडीजला 20 षटकात 8 बाद 173 धावांवर रोखत महत्त्वाकांक्षी विजय संपादन केला.
विजयासाठी 241 धावांचे खडतर आव्हान असताना विंडीजतर्फे केरॉन पोलार्ड (39 चेंडूत 68) व हेतमेयर (24 चेंडूत 41) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. पोलार्डने अखेरपर्यंत एकहाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या प्रयत्नांना बऱयाच मर्यादा राहिल्या. गोलंदाजीत भारतीय संघातर्फे दीपक चहर, भुवनेश्‍वर, शमी व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेत विंडीजच्या इराद्यांना सुरुंग लावला. तत्पूर्वी, केएल राहुल (56 चेंडूत 91), रोहित शर्मा (34 चेंडूत 71) व कर्णधार विराट कोहली (29 चेंडूत नाबाद 70) यांच्या तुफानी अर्धशतकांच्या बळावर यजमान भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 240 धावांची टोलेबाजी केली. केएल राहुलने तडफदार फॉर्म कायम राखत 56 चेंडूत 9 चौकार, 4 षटकारांसह 91 धावा फटकावल्या तर सहकारी सलामीवीर रोहित शर्माही गोलंदाजांवर तुटून पडत 34 चेंडूत 71 धावांचे योगदान देऊन गेला. त्याच्या खेळीत 6 चौकार व 5 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला. टीकेचे लक्ष्य ठरत असलेला ऋषभ पंत मात्र या लढतीत देखील फलंदाजीच्या आघाडीवर पुन्हा एकदा अपयशी ठरला. तिसऱया स्थानी फलंदाजीत बढती मिळाल्यानंतरही पंत या संधीचेही सोने करु शकला नाही. तिसऱयाऐवजी चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरत कर्णधार विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी केली आणि 29 चेंडूतच नाबाद 70 धावा झोडपल्या. या खेळीत त्याने 4 चौकार व 7 टोलेजंग षटकार खेचले. श्रेयस अय्यर एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला. प्रारंभी, विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, रोहित शर्मा व केएल राहुल यांनी 11.4 षटकात 135 धावांची तडफदार सलामी दिल्यानंतर हा निर्णय पाहुण्या संघावरच उलटल्याचे स्पष्ट झाले. कॉट्रेल, जेसॉन होल्डर व पिएरे या आघाडीच्या तीनही गोलंदाजांची जबरदस्त धुलाई झाली. कॉट्रेलला 4 षटकात एका बळीसाठी 40 धावा मोजाव्या लागल्या तर जेसॉन होल्डरच्या 4 षटकातच 54 धावांची लयलूट भारताने केली. भरीत भर म्हणून होल्डरला एकही बळी मिळवता आला नाही. पिएरेने 2 षटकातच 35 धावा दिल्यानंतर त्याची गोलंदाजी थांबवली गेली. केसरिक विल्यम्स (4 षटकात 1-37), हेडन वॉल्श (4 षटकात 0-38) व केरॉन पोलार्ड (2 षटकात 1-33) यांनाही रोहित-केएल राहुल व विराट कोहलीच्या फटकेबाजीचा चांगलाच फटका बसला. रोहित-केएलने पहिल्या 6 षटकातच 72 धावांची आतषबाजी करत आपले इरादे स्पष्ट केले होते. रोहितने आपले अर्धशतक 23 चेंडूत तर राहुलने 29 चेंडूत साजरे केले. त्यानंतर कोहलीने आपला दर्जा दाखवत राहुलसमवेत तिसऱया गडयासाठी 45 चेंडूत 95 धावांची भागीदारी साकारली. रोहितने कॉट्रेलला कव्हर ड्राईव्हचा चौकार खेचत डावाची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जेसॉन होल्डरच्या दुसऱया षटकात राहुलने थर्डमॅनच्या दिशेने लागोपाठ चौकार फटकावले. केसरिक विल्यम्सच्या या जखमेवर आणखी मीठ चोळत सहाव्या षटकात दोन चौकार व एक षटकार वसूल केला. नंतर त्याने पिएरेला देखील दोन सलग षटकार व एक चौकार खेचले आणि भारताने 8 षटकात बिनबाद 102 अशी शतकी मजल मारली. नियमित सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱयांदा शतकी भागीदारी साकारली. डावाच्या मध्यात भारताच्या खात्यावर बिनबाद 116 धावा होत्या. विंडीजने नंतर रोहित व तिसऱया स्थानावर बढती देण्यात आलेल्या ऋषभ पंतला लवकर बाद करत डावात परतण्याचा प्रयत्न केला. नंतर कोहली राहुलच्या साथीला क्रीझवर आला आणि या जोडीने ताज्या दमाने फटकेबाजी सुरु केली. कोहलीने विशेषत: होल्डरचा जबरदस्त समाचार घेतला. त्याने डावातील 15 व्या षटकात 2 चौकार व एक षटकार वसूल केला. या षटकात भारताने 22 धावा फटकावल्या. डावातील शेवटच्या 5 षटकात पूर्णपणे विराटचा बोलबाला राहिला. विंडीजला यादरम्यान स्वैर गोलंदाजीचीही चांगलीच किंमत मोजावी लागली. कर्णधार विराटने फटकेबाजीचा ओघ कायम राखला आणि शेवटच्या चेंडूवर उत्तूंग षटकार खेचतच डावाची सांगता केली.

षटकारांबाबत रोहित शर्मा 'सुसाट'
रोहित शर्माने आपल्या घरच्या मैदानावर 34 चेंडूतच सहा चौकार व पाच षटकारांसह 71 धावांची झंझावाती खेळी करताना षटकारांचे नवे विक्रम केले.हे पाच षटकार लगावताना तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे षटकार लगावणारा जगातील तिसरा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला. शिवाय सर्वात जलद चारशे षटकार पूर्ण करण्याचाही त्याने विक्रम केला. रोहितने केवळ 360 डावांतच ही षटकारांची चार शतके पूर्ण केली तर षटकारांच्या बाबतीत त्याच्या पुढे असलेले शाहिद आफ्रिदी याने 437 डावात आणि ख्रिस गेलने 486 डावात आपले 400 षटकार पूर्ण केले होते. म्हणजे आफ्रिदीपेक्षा तब्बल 77 डाव आणि गेलपेक्षा 126 कमी डावांतच रोहितने हा टप्पा गाठला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top