Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
62 ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

62 ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव पोलिसांची कारवाई : जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा

ळगाव - अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी या घातक अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आणली आहे.

या कारवाईत 62.07 ग्रॅम एमडीसह एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मालेगावच्या एका संशयिताचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेला एमडी हा अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी इम्रान खान हयात खान (वय 36, मूळ रा. आडगाव, सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, जळगाव) याला अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अमली पदार्थ त्याला रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रफीक विरुद्धही गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाई एमडी ड्रग्ज 39.06 ग्रॅम 1 लाख 96हजार, 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी 36 हजार आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी 56 हजार अशा प्रकारे एकूण 62.07 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून त्याची बाजारपेठीय किंमत सुमारे 2 लाख 88 हजार रुपये आहे. तर 20 हजार रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि 50 हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी जळगाव पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनाही आपल्या परिसरात अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live