Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

भुसावळ

ई आणि रेल्वे कर्मचाऱ्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांचा संशय मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) रात्री भुसावळ शहरातील पाटीलमळा परिसरात घडली.

तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित मुलाच्या आईचे आणि तुषार सोनवणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय मुलाच्या मनात होता. या कारणातून त्याने काही दिवसांपूर्वीच तुषार यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयिताने तुषार सोनवणे यांना फोन करून त्यांचे वडील नाशिकला गेल्याचे सांगितले. त्यानंतर तो एमएच १९ सीएच १४०५ क्रमांकाच्या दुचाकीवरून पाटीलमळा परिसरात तुषार यांना घेण्यासाठी गेला. तुषार यांना सोबत घेऊन परत येत असताना संशयिताने दुचाकी तुषार यांना चालविण्यास सांगितली. तुषार दुचाकी चालवत असताना घराजवळ पोहोचताच संशयिताने पाठीमागून त्यांच्या डोक्याच्या खालील भागावर तसेच पाठीवर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तुषार यांना रुग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, जळगाव गुन्हे शाखेचे पथक त्यावेळी शहरातच होते. घटनेची माहिती मिळताच पथकाने तत्काळ संशयिताचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेतील पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततेचे वातावरण असताना रात्रीच्या सुमारास घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे पाटीलमळा परिसरासह भुसावळ शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राहुल तायडे करीत आहेत. घटनेनंतर परिसरात सध्या शांतता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live