Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आषाढीनिमित्त संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर

आषाढीनिमित्त संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

षाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताई मूळ मंदिर, कोथळी तसेच मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताई मंदिर येथे मुक्ताईनगर तालुक्यासह विदर्भ आणि मध्य प्रदेशातील हजारो वारकरी व भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

पंढरपूरच्या आषाढी वारीला जाऊ न शकणारे अनेक भाविक या दिवशी संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी कोथळी व नवीन मंदिरात येत असल्याने दोन्ही मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरात पहाटे अभिषेक महापूजा पार पडली. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिरात आलेल्या भाविकांसाठी सुमारे दीड क्विंटल साबुदाणा खिचडीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. हा फराळ बाबुराव ठाकरे, योगेश चोपडे आणि राजेंद्र पानकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सकाळी संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी त्यांचा श्रीफळ व मुक्ताई चरित्र ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.

मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताई मंदिरातही भाविकांची दिवसभर मोठी गर्दी होती. येथे वैकुंठवासी लक्ष्मण बळीराम चौधरी यांच्या स्मरणार्थ मनोज चौधरी यांच्या वतीने तब्बल चार क्विंटल साबुदाणा खिचडीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान, कोथळी येथील मूळ मंदिरात रांगोळी कलाकार देवा रावणचवरे यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध संतांची आकर्षक रांगोळी साकारली होती. या कलाकृतीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होत असून अनेकांनी या कलाकृतीचे कौतुक केले.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संत मुक्ताईंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शन, पूजा-अर्चा, महाप्रसाद, संतांच्या नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे कोथळी व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि अध्यात्मिक आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live