Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमळनेरमधील कत्तलखाना अखेर सील!

अमळनेरमधील कत्तलखाना अखेर सील!

हिंदू संघटनांसमोर प्रशासन नरमले : कत्तलीप्रकरणी पालिकेची कारवाई

अमळनेर : शहरातील कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचे सलग दोन दिवस उघडकीस आल्यानंतर अखेर नगरपालिका प्रशासनाने कत्तलखाना सील करण्याची कारवाई केली आहे.

या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली होती.
अमळनेर येथील कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर सलग दोन दिवस पोलिसांच्या पथकाने तपासणी केली असता गोवंशाची कत्तल झाल्याचे तसेच कत्तल केलेले मांस, जनावरांची कातडी आणि शिंगे आढळून आली होती. या कारवाईत सुमारे 570 किलो मांस आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. या घटनेनंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या वतीने शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो उध्वस्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांच्या भावनांचा आदर राखला जावा, यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नगरसेवकांसह संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा केली. नियम व आदेशांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कठोर कारवाईपूर्वी कत्तलखाना सील करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश दिले. आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, संतोष जाधव, किरण कंडारे तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मयूर पाटील, नम्रता जरे, योगेश पवार, परम चव्हाण, रिजवान शेख सलीम आणि अनंत संदानशिव यांच्या पथकाने कत्तलखाना सील केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live