Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमळनेरमध्ये बनावट बांधकाम परवानग्यांचा भंडाफोड

अमळनेरमध्ये बनावट बांधकाम परवानग्यांचा भंडाफोड

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात काही खासगी अभियंत्यांकडून नगरपरिषदेच्या बनावट बांधकाम परवानग्या तसेच बनावट चलन पावत्या देऊन नगरपरिषद आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

फोटोशॉपच्या माध्यमातून अधिकृत परवानग्या आणि पावत्यांमध्ये फेरफार करून त्या नागरिकांना दिल्या जात असल्याचे नगरपरिषदेच्या चौकशीत समोर आले आहे. आतापर्यंत अशा ६० ते ७० प्रकरणांचा उलगडा झाला असून, यापेक्षाही अधिक प्रकरणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरात नव्याने अभियंता म्हणून व्यवसाय सुरू केलेल्या काही तरुणांनी बांधकाम परवानगी मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून कंत्राटे घेतली. मात्र, नागरिकांना नगरपरिषदेत न आणता त्यांचे अर्जही पालिकेत सादर न करता परस्पर स्कॅन केलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बांधकाम परवानग्या आणि बनावट चलन पावत्या दिल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

काही नागरिक बांधकाम परवानगीसंदर्भात नगरपरिषदेत गेले असता, त्यांच्या परवानग्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एका खासगी अभियंत्याचे नाव समोर आले. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, संबंधित अभियंता मूळ परवानगी आणि पावती फोटोशॉपमध्ये एडिट करून नागरिकांना देत असल्याचे आढळून आले.

विशेष म्हणजे, या बनावट बांधकाम परवानग्या आणि पावत्यांच्या आधारे काही नागरिकांना बँकांकडून कर्जदेखील मंजूर झाले आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाले असून, नागरिकांकडून घेतलेली रक्कम पालिकेत जमा न करता संबंधित कथित अभियंत्यांनी स्वतःच्या खिशात घातल्याचे समोर आले आहे.

क्यूआर कोडद्वारे परवानग्यांची तपासणी

या प्रकाराची गंभीर दखल घेत नगरपरिषदेने यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे. क्यूआर कोडद्वारे बांधकाम परवानग्यांची सत्यता तपासण्यात येणार आहे. तसेच संबंधित बँकांनाही पत्र दिले जाणार आहे. नागरिकांनी आपली बांधकाम परवानगी अधिकृत बीपीएमएस प्रणालीवर नोंदवली आहे किंवा नाही, याची खात्री करावी. अधिकृत प्रणालीवर नोंद नसलेली परवानगी ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परवानग्या अधिकृत करून घ्याव्यात, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात येणार आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून बनावट परवानग्या घेणाऱ्या नागरिकांकडून संबंधित फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची नावे उघडकीस आणावीत. अन्यथा नगरपरिषदेला आवश्यक शुल्क न भरता परस्पर बनावट परवानग्या घेणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फौजदारी गुन्हे दाखल करणार : नगराध्यक्ष

नगरपरिषद आणि नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या सर्व अभियंत्यांचा व दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंदर्भात मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांना आदेश देऊन उचित आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live