Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याची दहशत कायम

अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याची दहशत कायम

भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतुर्ली बुद्रुक (ता. भडगाव) परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून, एका शेतकऱ्याच्या बंदिस्त शेडमध्ये शिरून बिबट्याने सुमारे ३५ हजार रुपये किमतीची गाय ठार केल्याची घटना घडली आहे.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

अंतुर्ली बुद्रुक शिवारातील गट क्रमांक २२६ (हर्षल रवींद्र समदाणी) तसेच गट क्रमांक १२६/२ (निंबा दगा पाटील) परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तरुण शेतकरी राहुल निंबा पाटील हे बैलगाडीने शेतातून जात असताना अचानक बिबट्या त्यांच्या दिशेने धावत आला. प्रसंगावधान राखत राहुल पाटील यांनी बैलगाडीवर चढून मोठ्याने आरडाओरड केली. बैलांनीही जोरदार आवाज केल्याने बिबट्याने तेथून पळ काढत जवळील झुडपांचा आसरा घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, अंतुर्ली बुद्रुक येथील शेतकरी सुरेश रामकृष्ण पाटील यांच्या गट क्रमांक २४४/१-ब मधील बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने प्रवेश केला. शेडमध्ये बांधलेल्या गायीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले. या गायीची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वीही सुमारे चार महिन्यांपूर्वी याच परिसरातील बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने प्रवेश करून वासरीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याच्या सलग घटनांमुळे अंतुर्ली बुद्रुकसह भातखंडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे करताना, जनावरांची देखभाल करताना तसेच शेताकडे ये-जा करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

वन विभागाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून बिबट्याचा माग काढावा, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे बसवावेत , तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, भडगाव वनरक्षक प्रमिला रमेश अंबुरे व मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. यावेळी शेतकरी सुरेश पाटील तसेच भातखंडे येथील प्रकाश पाटील उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live