लोकशाही न्यूज नेटवर्क
आपत्कालीन सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ क्रमांकावर खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे २०.२७ वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वरून भडगाव पोलीस स्टेशन येथे कॉल प्राप्त झाला. या कॉलमध्ये गोंडगाव (ता. भडगाव) येथील पाटाच्या मोरीजवळ जुगार सुरू असल्याची माहिती देत पोलिसांनी तत्काळ रेड करावी, अशी विनंती करण्यात आली होती. हा कॉल श्री. विजय शांताराम पाटील (रा. गोंडगाव, ता. भडगाव) यांनी केला होता.
सदर माहितीची खात्री करण्यासाठी ड्युटीवरील पोलीस कॉन्स्टेबल योगेश देसाई व पोलीस कॉन्स्टेबल विशाल कैलास इंगळे हे शासकीय मोटरसायकलने तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार सुरू नसल्याचे आढळून आले. कॉलमध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणतीही संशयास्पद हालचालही दिसून आली नाही.
यावेळी कॉल करणारे विजय पाटील घटनास्थळीच आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अखेर दारूच्या नशेत आपण खोटा कॉल केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी विजय शांताराम पाटील यांच्याविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२०२६ नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ८५(१) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२७ अंतर्गत ०४ एप्रिल २०२६ रोजी रात्री २२.४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटा कॉल करणे गंभीर गुन्हा!
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल ११२ ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना खोटे कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारे खोटी माहिती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांना न्यायालयात हजर करण्यात येईल, अशीही सूचना पोलिसांनी दिली आहे.

