लोकशाही न्यूज नेटवर्क
नागभीड तालुक्यातील बोन्ड येथे भरधाव टिप्पर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात एक महिला व एक पुरुष जखमी झाले असून बसमधील इतर प्रवासी सुदैवाने बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूरवरून येणारी एसटी बस (क्र. एमएच 07 सी 9373) आपल्या नियमित मार्गाने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून चालकाला ताब्यात घेतले. संबंधित टिप्परवर क्रमांक नसल्याचे समोर आल्याने वाहनाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मांढरे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी बोन्ड परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मार्ग अरुंद झाला असून, शेतकऱ्यांनी टाकलेल्या कुंपणांमुळे मोठ्या वाहनांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे समोरासमोर वाहने आल्यास अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी; अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही," अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

