दोन आरोपी ताब्यात; गुटखा, पानमसाला व आयशर वाहनाचा समावेश
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ तसेच आयशर वाहन असा एकूण १६ लाख ९९ हजार ८९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभितकुमार फटके यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हिरापूर रोड परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी निखिलेश सुनील केवळे (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जिल्हेपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयशर वाहनातून गुटखा वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत मधुकर धाडू इमके (वय ४८, रा. खेडी, शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील MH-48-AY-2468 क्रमांकाच्या आयशर वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३२/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच आयशर वाहनाचा समावेश आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

