Dailyhunt
चंद्रपूर-गोंडपिपरी मार्गावर हृदयद्रावक अपघात

चंद्रपूर-गोंडपिपरी मार्गावर हृदयद्रावक अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्रपूर-गोंडपिपरी मार्गावर सोमवारी सायंकाळी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेमुळे अनखोडा परिसरात शोककळा पसरली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा येथील रहिवासी गौतम सुरेश निमसरकर (३५) हे आपली पत्नी वैशाली (३२) आणि मुलगी सिया (६) यांच्यासह दुचाकीने प्रवास करत होते. सोमवारी, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास धानापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग पथक आणि गोंडपिपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.

गंभीर जखमी झालेल्या वैशाली आणि चिमुरड्या सियाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान वैशाली निमसरकर यांचीही प्राणज्योत मालवली. सहा वर्षांची सिया सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका भीषण अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या चिमुरडीच्या परिस्थितीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live