Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद!

चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद!

सिंदेवाही, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगल परिसरात चार महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. विशेष पथकाने ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या साहाय्याने ही कारवाई केली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी सकाळी गुंजेवाही जंगलात काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या असताना अचानक वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला होता. या भीषण घटनेत चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हल्लेखोर वाघिणीला पकडण्याची मागणी जोर धरू लागली.

वन विभागाने घटनास्थळाचा तपास आणि पावलांचे निरीक्षण केल्यानंतर हा हल्ला टी-2 नामक वाघिणीने केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा शोध सुरू केला. अखेर शनिवारी रात्री पवनपार बीट कक्ष क्रमांक २८२ परिसरात ही मोहीम यशस्वी ठरली. सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारण्यात आला. सुरुवातीला अंधारामुळे पकडलेला वाघ हल्लेखोर वाघीणच आहे का, याबाबत संभ्रम होता. मात्र नंतर तीच टी-2 वाघीण असल्याची खात्री झाल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिला पूर्णपणे जेरबंद करण्यात आले. वन विभागाच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान वाघिणीचे बछडे तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे आता त्या बछड्यांचा स्वतंत्र शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी सरकार आणि वन विभागावर तीव्र टीका केली आहे. जंगल परिसरात उपजीविकेसाठी जाणाऱ्या ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुंजेवाहीतील या घटनेमुळे गतवर्षी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलातील दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या वेळीही तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही वन विभागाला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा चार महिलांचा बळी गेल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live