Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चौधरी-महाजन ऑडिओ क्लिप : पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन!

चौधरी-महाजन ऑडिओ क्लिप : पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन!

लोकशाही संपादकीय लेख

नंदुरबार येथील भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील टेलिफोनवरील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून ती सध्या फार गाजत आहे.

नंदुरबारचे विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी त्यांच्या मनात जे होते ते सारे या क्लिपमधून समोर आले आहे.

रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि एकनाथराव खडसे यांच्याविषयी ज्या अश्लील भाषेत बोलले आहे, ते अत्यंत किळसवाणे आहे. महिलांविषयी आपण काय बोलत आहोत, याचे साधे भानही विजय चौधरी यांना राहिले नाही. ते फोनवरून गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधत आहेत आणि गिरीश महाजन हे त्यांना फक्त होकारार्थी, सकारात्मक उत्तर देत आहेत. विजय चौधरी यांनी रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयी अश्लील भाषेत जे वक्तव्य केले, त्याला महाजन यांनी फक्त होकारार्थी उत्तर दिले. मात्र, महाजन यांनी विजय चौधरी यांच्या बोलण्याला कुठेही विरोध दर्शवला नाही. किंबहुना, “खडसे यांनी राजीनामा मागितला पाहिजे,” असे विजय चौधरी म्हणतात. त्यावर “बघा पुढे काय होईल,” असे बोलून महाजन यांनी आपली संयमी भूमिका दर्शवली.

विजय चौधरी यांनी खडसे परिवाराविरुद्ध बोलून ते थांबले नाहीत. त्यांनी नंदुरबारचे भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांची कन्या हिना गावित यांच्याविषयीसुद्धा फोनवरून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. “विजयकुमार गावित हा भाजपचा पक्ष बुडवायला निघाला आहे. त्यांची मुलगी हिना गावित ही लोकसभेत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध पराभूत झाली. भाजप पक्ष म्हणजे आपलीच प्रॉपर्टी,” अशा भाषेचा त्यांनी वापर केला आहे. याबाबतीतही मंत्री गिरीश महाजन यांनी तशीच मूक संमती दर्शवली आहे.

मात्र, खडसे परिवाराच्या बाबतीत जे वक्तव्य केले गेले, ते अशोभनीय आहे. याबाबत रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भाजप नेत्यांच्या तोंडून कटू भाषा वाहत आहे. जी भाषा बोलायला नको, ती त्यांनी बोलून बडबड केली आहे. “माझे भाजपमधील महिलांना आवाहन आहे की, हे तुमचे नेते कसे बोलतात, कसे वागतात, हे तुम्हीच ठरवा. भाजपमधील महिलांनी जरा जपून राहावे,” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, या संदर्भात एकनाथराव खडसे यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हे विशेष होय.

ही चौधरी आणि महाजन यांच्यातील ऑडिओ क्लिप खरी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संदर्भात विजय चौधरी यांचे ट्विटर हँडल वापरणारे पीए यश टिपरे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असून त्यांना पुणे येथून नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेऊन नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबतीत नंदुरबार पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली असून, यश टिपरे यांच्या संदर्भात माध्यमांनी काही लिहिले तर ते सहन केले जाणार नाही, असे नंदुरबारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने यश टिपरे यांच्या संदर्भात काहीही लिहू किंवा प्रसारित करू नये, असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कारण यापूर्वी विजय चौधरी यांची खोटी ऑडिओ क्लिप यश यांच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली होती. ती क्लिप मात्र खोटी व बनावट असल्याचे निदर्शनास आले होते.

या संदर्भात चौधरी आणि महाजन यांच्या ऑडिओ क्लिपमधून भाजप पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन झाले आहे. म्हणजे भाजपमधील एक गट आपल्याला नको आहे, हेच विजय चौधरी यांच्या वक्तव्यांतून जाणवते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय चौधरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबतीत लेवा पाटीदार समाजाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या समर्थनार्थ नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लेवा पाटीदार व गुजर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे चरित्रहनन करणाऱ्या विजय चौधरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत ही कारवाई झाली नाही, तर आम्ही यापेक्षा अधिक संख्येने तुमच्या कार्यालयावर येऊ आणि त्यावेळी विजय चौधरी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे.

मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला. नंदुरबार जिल्ह्यात खरेतर रघुवंशी आणि विजयकुमार गावित यांचे हाडवैर आहे. मात्र, त्याऐवजी विजय चौधरी यांच्या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एकंदरीत गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांचे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून मतभेद होते, असे यावरून दिसून येते. पण जे काही चालले आहे, ते भाजप पक्षाच्या दृष्टीने सर्व काही आलबेल असल्याचे वाटत नाही. पाहूया, भाजपचे वरिष्ठ नेते याबाबतीत कोणती ॲक्शन घेतात. त्यांच्यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live