मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु.
ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात 'चित्रपताका' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत 'महाराष्ट्र माझ्या नजरेतून…' ही लघुपट स्पर्धा आणि 'पुस्तक ते सिनेमा' हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांना महोत्सवाच्या www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून सहभागी होता येणार आहे.
'महाराष्ट्र माझ्या नजरेतून…' या लघुपट स्पर्धेच्या माध्यमातून तरुण चित्रपटकर्मींना महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, वारसा, परंपरा, लोकजीवन, कला, निसर्ग आणि समकालीन वास्तव यांचा वेध घेणारी आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार आहे. पाच मिनिटांपर्यंतच्या लघुपटांद्वारे महाराष्ट्राची गोष्ट आपल्या स्वतंत्र दृष्टिकोनातून मांडावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नव्या कल्पना आणि स्वतंत्र अभिव्यक्तीला प्रोत्साहन देतानाच १८ ते ३५ वयोगटातील उदयोन्मुख लघुपट दिग्दर्शकांचे स्पर्धेतील सर्वोत्तम लघुपट 'चित्रपताका' मराठी चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

मराठी साहित्य आणि चित्रपट क्षेत्र यांच्यातील अनुबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने 'पुस्तक ते सिनेमा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चित्रपट किंवा वेबमालिकेत रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित मराठी पुस्तकांच्या शिफारशी या उपक्रमांतर्गत मागविण्यात येत आहेत. कथा, कादंबरी, नाटक, चरित्रपर, आत्मकथन यांसह अन्य साहित्यप्रकारांतील पुस्तकांची यासाठी नोंदणी करता येणार आहे. प्राप्त पुस्तकांमधून निवडक साहित्यकृतींची परीक्षण समितीमार्फत निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या पुस्तकांच्या लेखकांना पटकथाकार, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर आपल्या साहित्यकृती मांडण्यासाठी महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लेखक अथवा संबंधित पुस्तकाच्या स्वामित्वहक्क धारकाने महोत्सवाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यासोबतच पुस्तकाची एक छापील प्रत परीक्षणासाठी पाठविणे आवश्यक आहे. दोन्ही उपक्रमांसाठी १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, इच्छुक युवा चित्रपटकर्मी आणि लेखकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

