भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी (दि. २६) सकाळी साडेआठच्या सुमारास कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास तसेच शेती विकण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याने त्याची पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र ललिता यांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच आरोपी हा शेती विकण्याचा आग्रह धरत होता, मात्र ललिता यांनी त्यालाही विरोध केला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
या वादातून संतापलेल्या आत्माराम राठोड याने चाकूने पत्नीच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या ललिता राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आत्माराम राठोड याला त्वरित ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत आहेत.

