Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!

गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!

लोकशाही संपादकीय लेख

कोल्हापूरच्या राजकारणात सहकार क्षेत्राला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँका आणि बाजार समित्या या केवळ आर्थिक संस्था न राहता ग्रामीण राजकारणाची सत्ताकेंद्रे बनल्या आहेत.

याच सहकार क्षेत्रातील प्रभावशाली संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'मधील सत्तासंघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. निवडणुकीतील कौल, अध्यक्ष निवडीतील अडथळे, शासनाचा कायद्यात बदल करण्याचा निर्णय, न्यायालयीन लढाई आणि संघर्ष मोर्चामुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या सगळ्या संघर्षात सहकाराचा मूळ उद्देश आणि दूध उत्पादकांचे हित कुठे हरवले, हा खरा प्रश्न आहे. १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत विजय मिळविला, तर महायुती समर्थित पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका जागेच्या फरकाने मिळालेला हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता. कारण महायुतीच्या बाजूने मंत्री, आमदार आणि खासदारांची मोठी फौज मैदानात उतरली होती. दुसरीकडे, सतेज पाटील यांनी स्थानिक सहकार क्षेत्रातील प्रभाव, दूध उत्पादकांचे प्रश्न आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आधार घेत निवडणुकीत बाजी मारली. मतदारांनी दिलेला कौल स्वीकारून सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित राहिले. परिणामी, आवश्यक १४ संचालकांचा कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि सभा तहकूब करावी लागली. १३ संचालकांचे संख्याबळ असलेल्या समविचारी आघाडीला बहुमत असूनही अध्यक्ष निवडता आला नाही. हा केवळ संस्थेच्या कामकाजातील तांत्रिक पेच आहे की बहुमताच्या कौलाला रोखण्याचा राजकीय प्रयत्न, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर समविचारी आघाडीने न्यायालयाचे दार ठोठावले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची सभा घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या संघर्षाला अधिक व्यापक स्वरूप मिळाले ते राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या सहकारी संस्थांवरील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयामुळे. मोठी वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त सदस्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामध्ये एका शासकीय अधिकाऱ्यासह चार तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असून, तज्ज्ञ सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याची तरतूद प्रस्तावित आहे. गोकुळसारख्या मोठ्या उलाढालीच्या संस्थेवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत १३ जागा जिंकलेल्या समविचारी आघाडीच्या बहुमताचे गणित या नियुक्त्यांमुळे बदलू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मग निवडणुकीत सभासदांनी दिलेल्या कौलाचे महत्त्व काय राहणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सतेज पाटील यांनी शासनाचा निर्णय म्हणजे दूध उत्पादकांच्या जनादेशावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. निवडणुकीतील पराभव स्वीकारण्याऐवजी कायद्यात बदल करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका विरोधकांनी मांडली. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही समविचारी आघाडीने केली. दुसरीकडे, महायुतीच्या नेत्यांनी कोरमची अट आणि संचालक मंडळाच्या नियमांचा दाखला देत आपली भूमिका मांडली आहे. संस्थेतील पेच सोडविण्याचा उद्देश शासनाच्या निर्णयामागे असल्याचे सत्ताधारी बाजूचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारचा गोकुळ ताब्यात घेण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, हेतूपेक्षा निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार, हे अधिक महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर रोजी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चातून शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला. गोकुळचा प्रश्न आता केवळ संचालक मंडळातील संख्याबळापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेचा, लोकशाही प्रक्रियेचा आणि निवडणुकीत सभासदांनी दिलेल्या कौलाच्या सन्मानाचा मुद्दा बनला आहे. गोकुळचे महत्त्व लक्षात घेतले, तर हा संघर्ष अधिक गंभीर वाटतो. गोकुळ हा केवळ दूध संकलन आणि विक्री करणारा संघ नाही. हजारो दूध उत्पादक शेतकरी, ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्था, पशुपालक, वाहतूकदार आणि कर्मचारी अशा मोठ्या यंत्रणेचे आर्थिक भवितव्य या संस्थेशी जोडलेले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे गोकुळवरील नियंत्रण म्हणजे केवळ अध्यक्षपदाची खुर्ची मिळविणे नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मोठ्या आर्थिक व्यवस्थेवर प्रभाव निर्माण करणे होय. म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणातील दिग्गज नेते या सत्तासंघर्षात सक्रिय झाले आहेत. सतेज पाटील यांच्यासाठी ही लढाई सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि राजकीय अस्तित्व टिकविण्याची आहे, तर महायुतीसाठी गोकुळवरील प्रभाव कायम राखणे प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. मात्र, नेत्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा दूध उत्पादकांचे हित मोठे नाही काय? आज दूध उत्पादकांसमोर पशुखाद्याचे वाढते दर, जनावरांच्या देखभालीचा खर्च, औषधोपचार, मजुरी आणि चाऱ्याचा खर्च असे अनेक प्रश्न आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना दूध उत्पादकाला मिळणारा दर समाधानकारक असणे आवश्यक आहे. दूध संकलन केंद्रांवरील सुविधा, वेळेवर होणारे पेमेंट, गुणवत्तेनुसार दर आणि ग्रामीण भागातील दूध संस्थांचे सक्षमीकरण या मुद्द्यांना प्राधान्य मिळायला हवे. परंतु सध्या या प्रश्नांपेक्षा अध्यक्ष कोण होणार आणि सत्ता कोणाच्या हातात जाणार, याचीच चर्चा अधिक होत आहे. शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या संस्थेत शेतकऱ्यांचे प्रश्नच दुय्यम ठरत असतील, तर सहकाराच्या यशाचे मोजमाप नेमके कशाच्या आधारावर करायचे? सहकार चळवळीचा मूळ उद्देश सामूहिक विकासाचा आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था उभारणे आणि तिचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने करणे, ही सहकाराची खरी ताकद आहे. मात्र, कालांतराने अनेक सहकारी संस्था राजकीय सत्तासंघर्षाची केंद्रे बनल्या. निवडणुका पक्षीय प्रतिष्ठेच्या झाल्या आणि संस्थेची आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे दुय्यम ठरली. गोकुळमधील सध्याचा संघर्ष याच वास्तवाची जाणीव करून देतो. सहकाराच्या नावाखाली राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू राहिली, तर संस्थेच्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. आता १० नोव्हेंबरची अध्यक्ष निवड आणि शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाला दिलेले आव्हान या संघर्षाची पुढील दिशा ठरविणार आहे. या प्रक्रियेत कायद्याचा अंतिम अर्थ आणि दूध उत्पादकांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवे. गोकुळची सत्ता सतेज पाटील यांच्या हातात जाते की महायुती आपले राजकीय गणित यशस्वी करते, हा प्रश्न काही काळ चर्चेत राहील. मात्र, या सत्तासंघर्षात दूध उत्पादकांचा विश्वास हरवता कामा नये. सहकारी संस्थेची खुर्ची ही कोणत्याही नेत्याची वैयक्तिक मालमत्ता नसते; ती हजारो शेतकरी कुटुंबांच्या कष्टातून उभी राहिलेली सार्वजनिक जबाबदारी असते. राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत सहकाराचा मूळ आत्मा आणि दूध उत्पादकांचे हित जपले गेले पाहिजे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live