लोकशाही संपादकीय लेख
महावितरणच्या त्रासामुळे जळगावातील उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे असे झाले की, महावितरण कडून पाच एमव्हीचा ट्रांसफार्मर मंजूर होऊन दोन महिने झाले, परंतु तो ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरण कडून दिरंगाई करण्यात येत आहे किंवा तो बसविण्यात येत नाही.
त्यामुळे छोट्या उद्योगांना अडचणी निर्माण होत आहेत. नुकतेच छोटे उद्योग संघटनेच्या मार्फत आंदोलन करण्यात आले. आमच्या अडचणी सोडवा अन्यथा आम्हाला आमचे उद्योग स्थलांतरित करावे लागतील. त्यांचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले होते.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी थेट महावितरण विभागाच्या नाशिक विभागीय कार्यकर्त्यांच्या श्री. मुलाणी यांना फोन लावला आणि फोनवरून जे खडसावले त्याला तोड नाही. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावत एमआयडीसी एरियात पाच एमव्हीचा ट्रांसफार्मर मंजूर होऊन दोन महिने झाले.
ते का सुरू झाले नाही? त्यावर काहीतरी थातूरमातूर उत्तर त्यांच्याकडून मिळाले किंवा "मोठे उद्योग येण्यासाठी आम्ही त्याची वाट पाहत आहोत" असे त्यांनी सांगितले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी जे मार्मिक उत्तर दिले ते विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले जेथे येथे जळगावला 45 अंशावर तापमान आहे, त्या तापमानात काम करणे किती जिकरीचे आहे, ते तुम्हाला नाशिक येथे एसीमध्ये बसून काय कळणार?
जरा नाशिक सोडून बाहेर.. या आणि मग कळेल की 45 अंश तापमानात कसे काम करावे लागते? आपण उद्याच्या उद्या जळगावला येऊन तो ट्रान्सफॉर्मर बसवण्याची तसदी घ्या.. जळगावत मोठे उद्योग येतील तेव्हा येतील, आज असलेले छोटे उद्योग तेथून स्थलांतरित झाले तर आज शेतकऱ्यांच्या मुलांना जे १५-१६ हजार रुपये पगार मिळतात, ती मुले कुठे जाणार?
मोठे उद्योग येतील. त्यामागे दहा-बारा हजार तरुणांना रोजगार मिळेल तेव्हा मिळेल, आज हे छोटे उद्योग तेथे येथून निघून गेले तर शेतकऱ्यांची मुलं बेकार होतील त्याचे काय? म्हणून मला आजच्या आज पाच एमव्ही ट्रान्सफॉर्मर लावून पाहिजे. जे मंजूर होऊन दोन महिने झाले आहेत.
ते का लागत नाही? गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर होते. पत्रकारांनी त्यांना विचारले की महावितरणच्या अधिकाऱ्यांना तुम्ही चांगलेच खडसावले तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तरात गुलाबराव पाटील म्हणाले की, खडसावण्याचा प्रश्नच नाही. ही भावना आहे.
जे काम होणार आहे ते झाले पाहिजे. ते का होत नाही? हा आमचा प्रश्न आहे. अधिकारी आपल्या मनाप्रमाणे काम करतात ते कसे काय चालेल? त्यासाठी मी जे आहे ते स्पष्टपणे बोललो. अधिकाऱ्यांनी ती कामे केली पाहिजेत, अन्यथा आमचे छोटे उद्योग स्थलांतरित होतील ही त्या मागची भावना आहे.

