Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

लोकशाही संपादकीय लेख

राठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. सरकार म्हणते, जरांगे पाटलांच्या १५ मागण्यांपैकी १४ मागण्या मंजूर झाल्या आहेत.

एक मागणी न्यायिक कचाट्यात अडकली असल्यामुळे ती मंजूर होत नाही. त्यामुळे सध्या दोन पावले पुढे येऊन सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. आता जरांगे पाटलांनी दोन पावले पुढे येऊन समझोता करावा, अशी सरकारची मागणी आहे. आता यापुढे शासनाचे एकही शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटणार नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हिटलिस्टवर जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तसे आता त्यांचे आवडते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील हेही आहेत. एकनाथ शिंदे यांना मी मराठ्यांचा समर्थक समजत होतो; पण त्यांनी विश्वासघात केला. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने मराठा आंदोलनाला विरोध केला आहे, ते तितक्या लवकर संपतील, अशी भाषा जरांगे पाटलांनी शिंदे यांच्या बाबतीत केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्व मराठ्यांना मुंबईकडे रवाना होण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तुम्ही सर्वजण मुंबईला जा; पण आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्यावर जाण्याची मुळीच घाई करू नका. आपण सर्वजण मुंबईत आपापल्या नातेवाईकांकडे राहा. मी १९ तारखेला मुंबईला येईन. तेव्हा आपण सर्वजण आझाद मैदानावर भेटू. त्याआधी आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्यावर जाण्याची घाई केली, तर शासन जागे होईल. त्यामुळे १९ तारखेला आझाद मैदानावर येण्याची सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील १५ तारखेला अंतरवाली सराटीतून निघून पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा या गावी करतील. त्यानंतर पाटोदा येथून निघून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे त्यांचा मुक्काम राहील. श्रीगोंदा येथून निघून पुणे येथील हडपसर येथे मुक्काम, त्यानंतर अलिबाग येथे मुक्काम करून मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचतील.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठ्यांचा ताफा असेल. ते जिथे जिथे मुक्काम करतील, त्या ठिकाणी समाजाच्या वतीने सर्व मराठी बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. जरांगे पाटील यांनी इतर मराठे बांधव, जे मुंबईला मोर्चात येऊ शकणार नाहीत, त्यांनी मोर्चेकऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुक्कामाच्या स्थळी यावे आणि जे काही आर्थिक मदत करता येईल, ती करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांच्या प्रवासात ज्या ज्या ठिकाणी मुक्काम होईल, तेथे जेवणाची व्यवस्था समाजबांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

अशा प्रकारे त्यांनी आता मुंबईकडे कूच करण्याचा कार्यक्रम आखला आहे. हा कार्यक्रम आधी जाहीर करण्याचे कारण म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचे धोरण असल्याचे म्हटले जाते. काल काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटलांची थेट भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचा अर्थ, मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याने त्यांच्या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

सर्व स्तरांवर आता मनोज जरांगे यांच्या भेटी झाल्या; पण त्यातील कोणत्याही भेटीला यश आले नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, माझ्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. गेल्या आठ दिवसांत विविध ठिकाणी जालना, बीड, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली येथे आंदोलने झाली. रास्ता रोको ठिकठिकाणी करण्यात आला, मोटारसायकल रॅली निघाली आणि कडकडीत बंद पाळण्यात आला. अंतरवाली सराटीवर यात्रेचे स्वरूप आले होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती, अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत येऊ नये, म्हणून त्याच्या विरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गाने कोणी आंदोलन करणार असेल, तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. परंतु मोर्चा हटवण्याची सरकारी यंत्रणा सज्ज आहे की नाही, असे सरकारी वकिलांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विचारले. त्यावेळी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे वकिलांनी सांगितले. आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर अनेक दृष्टीने प्रश्न उद्भवू शकतात. त्याला शासन कसे तोंड देते, हे पाहावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आदींची बैठक होऊन जरांगे पाटलांच्या मोर्चाबाबत विचारविनिमय करण्यात आला. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या बैठकीत बराच खल झाल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून ती परवानगी नाकारण्यात येईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळाली नाही, तर ते काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही झाले तरी मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटलांवर मराठ्यांचा तर विश्वास आहेच; पण गरीब तरुण मराठ्यांचाही अतिविश्वास त्यांच्यावर व्यक्त होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आज तरी मराठ्यांचे एकमेव नेते आहेत, की त्यांच्यावर मराठा समाजाचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मान्य केल्या असे सांगून सरकारने त्या अर्धवट मागण्या मान्य केल्या, असा जरांगे पाटलांचा आरोप आहे. आता हे शेवटचेच आरपारचे उपोषण राहील. एक तर मागण्या मान्य करा, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live