Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाचे आज उत्साहात आगमन झाले असून, गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली होती.

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, सजावट, आरास तसेच पूजेच्या साहित्याची तयारी मोठ्या उत्साहात करण्यात आली.

गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. गणेशमूर्ती घेऊन जाणारे भाविक, सजावटीच्या साहित्याने गजबजलेली दुकाने आणि सार्वजनिक गणेश मंडळांची सुरू असलेली लगबग यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देखावे आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यंदा तब्बल 2 हजार 990 गणेश मंडळांची नोंद झाली आहे. यामध्ये सार्वजनिक तसेच खासगी गणेश मंडळांचा समावेश आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजार 164 सार्वजनिक आणि 653 खासगी गणेश मंडळांची नोंद झाली आहे. जळगाव शहरातही गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असून, शहरात एकूण 407 गणेश मंडळांची नोंद झाली आहे. यापैकी 216 सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश आहे. शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक सजावट, देखावे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्याही मोठी आहे. गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या मूर्ती विक्री केंद्रांमध्ये पावसाचे पाणी शिरू नये आणि मूर्तींचे नुकसान होऊ नये, यासाठी विक्रेत्यांनी तातडीने ताडपत्री व प्लास्टिकचा आधार घेतला.

आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि सजावट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे सजावट आणि रंगकामाच्या कामात अडथळे निर्माण होत असून, कार्यकर्त्यांची चांगलीच कसरत होत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढावा आणि अनावश्यक स्पर्धेला आळा बसावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या एक गाव, एक गणपती उपक्रमालाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात तब्बल 173 ठिकाणी एक गाव, एक गणपती संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. शहरातील एमआयडीसी आणि तालुका हद्दीतही 10 एक गाव, एक गणपती मंडळांचा समावेश आहे.

संवेदनशील ठिकाणांवर नजर

स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखा आदी शाखांमधील 9 अधिकारी आणि 82 कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. याशिवाय होमगार्ड दलातील 2 हजार 190 जवान आणि 296 महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्तात समावेश आहे. 14 ते 26 सप्टेंबर या कालावधीत हा व्यापक पोलिस बंदोबस्त राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, गणेश मंडळे, विसर्जन मार्ग, संवेदनशील परिसर तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

5 हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील 35 पोलिस ठाण्यांतील विविध शाखांचे प्रभारी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच पुरुष व महिला पोलिस अंमलदारांसह सुमारे 5 हजार अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live