जळगावात 120 हून अधिक परिचारिकांचा कार्यशाळेत सहभाग
जळगाव : येथे महानेकॉन 2026 व द्वितीय खान्देशकॉन अंतर्गत नवजात शिशूंच्या सुरक्षित सेवेसाठी अनोखा प्रशिक्षण उपक्रम खेळ, प्रात्यक्षिके आणि सिम्युलेशनद्वारे परिचारिकांना मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
यात नवजात बालकांची सुरक्षितता, आपत्कालीन परिस्थितीतील योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक परिचर्या कौशल्ये अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवजात शिशूंचे चिकित्सीय मूल्यमापन, पुनर्जीवनप्रक्रिया आणि नवजात शिशू परिचर्येतील आवश्यक बाबींवर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेत 120 हून अधिक परिचारिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेचे संचालक डॉ. जेसल शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष डॉ. विनय जोशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक व्याख्यान पद्धतीऐवजी खेळाधारित शिक्षण या अभिनव संकल्पनेचा वापर करण्यात आला. विविध खेळ, टीम चॅलेंजेस, प्रश्नमंजुषा, सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले.
बाळाच्या आयुष्यातील पहिले सुवर्णक्षण जीवनरक्षणाचा सुवर्णतास बाळाचाश्वास,जीवनाचाविश्वास व्हेंटिलेटरद्वारेबाळाचेजीवनरक्षण! यासारख्या उपक्रमांमुळे प्रशिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी ठरले. कार्यशाळेत नवजात बालकांचे पुनर्जीवन, सेप्सिसचे लवकर निदान, गोल्डन अवर केअर, श्वसन सहाय्य, व्हेंटिलेटरची सुरक्षित हाताळणी, संसर्ग प्रतिबंध, नवजात बालकांची वाहतूक आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
परिचारिकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत संघभावना, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता यांचे प्रभावी दर्शन घडविले. खेळातून शिक्षण घेतल्यामुळे कठीण वैद्यकीय संकल्पना सहज समजतात, शिकलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या वेळी आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत होते, असा सकारात्मक संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
वैद्यकीय शिक्षणात नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून परिचारिकांचे कौशल्य वृद्धिंगत करणे आणि नवजात बालकांना अधिक सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हे या यशस्वी कार्यशाळेचे प्रमुख फलित ठरले आयोजन समितीमध्ये समाविष्ट डॉ. जेसल शेठ (मुंबई), डॉ. किरण मोरे (ठाणे), डॉ. सचिन जेठालिया (बीड), डॉ. नेहा काबरा (जळगाव), डॉ. शैलजा चव्हाण (जळगाव), डॉ. योगिता पाटील (रावेर), डॉ. अमोल सेरह (जामनेर), डॉ. सारिका सुरवाडे (जळगाव), डॉ. अनंत बेंडाळे (जळगाव), डॉ. अविनाश खेवडे (जळगाव), डॉ. अविनाश भोसले यांचा समावेश होता.

