Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोर्टाच्या स्थगितीतील जमिनीवर नांगरणीचा प्रयत्न

कोर्टाच्या स्थगितीतील जमिनीवर नांगरणीचा प्रयत्न

लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंत परिसरात जमीन वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या वादग्रस्त जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यावेळी महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

माहितीनुसार, पिंपळगाव बसंत येथील अजय गोसावी यांच्या कुटुंबामध्ये जमीन वाद सुरू असून हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधित जमिनीवर न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असतानाही ऋषिकेश निखिल गोसावी, अभिषेक निनाद गोसावी आणि इतर काही जणांनी भाड्याने ट्रॅक्टर आणून जमीन नांगरण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर अजय गोसावी, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी हे घटनास्थळी गेले. त्यांनी ट्रॅक्टर चालकाला याबाबत विचारणा केली असता चालकाने थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत रश्मी गोसावी आणि सुवर्णा गोसावी जखमी झाल्या असून त्यांच्यावर पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जखमी महिलांची प्रकृती गंभीर असतानाही पोलिसांनी आरोपींवर सौम्य स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जमिनीवर जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला, तरीही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जखमी महिलांना न्याय मिळावा, संबंधितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live