Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाच मागितल्यास निर्भयपणे तक्रार करा!

लाच मागितल्यास निर्भयपणे तक्रार करा!

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे नवनियुक्त उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या अनिल जिट्टावार यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिट्टावार यांना शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या भेटीदरम्यान भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास आणि लाचखोरीविरोधातील जनजागृती या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीविरोधात निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले.

कोणत्याही शासकीय कामासाठी पैसे, भेटवस्तू किंवा अन्य स्वरूपात लाभ मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसंदर्भात उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्याशी 9823270581 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार शासकीय काम लवकर करण्यासाठी पैसे मागणे, मंजुरी अथवा परवान्यासाठी रक्कम घेणे, बिल पास करण्यासाठी टक्केवारी मागणे, "चहा-पाणी"च्या नावाखाली पैसे उकळणे, कंत्राट मंजुरीसाठी कमिशन मागणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पैशांची मागणी करणे, तसेच चुकीचे काम करून देण्यासाठी लाभ स्वीकारणे हे सर्व प्रकार लाचखोरीच्या कक्षेत येतात.

याशिवाय महसूल, तलाठी, ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलीस विभाग किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या बदल्यात पैशांची मागणी करणे, फाईल पुढे सरकवण्यासाठी "सेवा शुल्क" मागणे, नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणे किंवा भेटवस्तू स्वीकारणे हे देखील गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, राजुरा तालुकाध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष वहाब अली सय्यद तसेच नागभीड तालुकाध्यक्ष यशवंत निकुरे उपस्थित होते.

नवनियुक्त उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत जनतेच्या सहकार्याने भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता लाचखोरीविरोधात पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live