Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे.

मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे.

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार झुकले यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. मात्र एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून कोणताही निर्णय घेतला तर त्याला विरोध आहे, या सरकारने ओबीसींचे वाटोळे केले. ओबीसींच्या ३७८ जातींपैकी २०० जातीतील लोकांचे दरडोई उत्पन्न २ हजार रुपये नाही. कोणी ताकद दाखवली म्हणून सरकार ओबीसींचे वाटोळे करत असेल तर जनता सोडणार नाही असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

जरांगे पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीला जलसंपदा विभागाची हजारो कोटींची काम मिळाली, ही काम मुख्यमंत्र्यांनी थांबवली म्हणून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्या का? म्हणून ते मुंबईला निघाले होते का? सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समझोता झाला आहे का? असे सवाल वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यात दरवर्षी दुष्काळाचे संकट उभे राहते. यंदाही गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला असून पिके धोक्यात आली आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर होत आहे. २०२३ मध्ये मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ६६ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ सुमारे १३ हजार कोटी रुपये देण्यात आलें. मतं घेताना मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि दुष्काळ जाहीर करूनही निधी द्यायचा नाही, हे मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नागरिकांना आशीर्वाद का दिया उपक्रमांतर्गत दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. यावर वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली. एकीकडे पंतप्रधान तेल कमी वापरण्याचा सल्ला देतात आणि दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवे लावण्याचे आवाहन करतात. देशातील कोट्यवधी लोकांनी दिवे लावले तर किती तेल खर्च होईल? जनतेच्या घरात खाण्यासाठी तेल आहे की दिव्यात टाकण्यासाठी? कोणाचे खरे मानायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. २०२६च्या पहिल्या आठ महिन्यांत नागपूर शहरातील हिंसक गुन्ह्यांमध्ये ४३ टक्क्यांची वाढ झाली असून हत्येच्या प्रयत्नांचे १४७ गुन्हे नोंदले गेले आहेत.

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्स पोहोचत असतील तर त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे शहर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा असलेल्या नागपुरात गुन्हेगारी वाढत असेल, तर प्रशासनाने स्वतःच्या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

गणेश मंडळांकडून पोलिसांनी पैसे मागितल्याच्या आरोपांवर वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली. पोलिस जर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत असतील तर कुंपण शेत खात आहे. आज पोलिस गणेश मंडळापर्यंत पोहोचले उद्या घरापर्यंत जातील, खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देऊन तिजोरी लुटतील. गुन्हेगारी वाढत आहे कारण गुन्हेगारांना पोलिसांचा वरदहस्त आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live