लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्याने ते केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या.
मात्र, या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना, "मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार," असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे ते केंद्र सरकारमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. गेल्या महिनाभरापासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना जबाबदारी मिळणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. विशेषतः उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांच्या घडामोडींनंतर या चर्चांना अधिक वेग आला होता.
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून याच काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार," असे स्पष्टपणे सांगत केंद्रात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

