जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील याला न्यायालयाने विविध कलमांखाली दोषी ठरवत एकूण 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच विविध कलमांनुसार दंडही ठोठावण्यात आला असून दंडाच्या रकमेतील 25 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड विधानाच्या कलम 366-अ अंतर्गत दोषी धरून 5 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास सुनावला आहे. तसेच बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 5(एम)/6 अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने अतिरिक्त कारावास ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, भारतीय दंड विधान कलम 506 (धमकी) अंतर्गत 1 वर्षाचा कारावास सुनावण्यात आला आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने प्रभावी बाजू मांडण्यात आली. तर पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य केले. न्यायालयाने दंडाच्या रकमेतून 25 हजार रुपये पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

