चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भोनक नदीच्या उगमस्थानी असलेले निंबादेवी धरण शंभर टक्के भरले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ३०६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, धरणाच्या सांडव्याच्या पायऱ्यांलगत असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग खचल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शाखा अभियंता वर्षा चव्हाण यांनी धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भिंतीचे नुकसान हे गेल्या वर्षीचे असून दुरुस्तीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होऊन आवश्यक काम हाती घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निंबादेवी धरणाची पाणीसाठा क्षमता २.४२८ दलघमी असून सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पाचा लाभ नायगाव, चुंचाळे, सावखेडा सिम, दहिगाव, शिरसाळ, साकळी, नावरे आणि वडोदे परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे.
दरम्यान, धरणाच्या सांडव्यातून वाहणारे अतिरिक्त पाणी नागादेवी पाझर तलावाकडे वळविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. असे झाल्यास नागादेवी पाझर तलावही दरवर्षी भरून दहिगाव, सावखेडा सिम, मोहराळा आदी गावांतील भूजल पातळी वाढण्यास आणि सिंचनासाठी मोठा फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

