Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फ्लाइट ट्रेनिंगदरम्यान दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

फ्लाइट ट्रेनिंगदरम्यान दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क

कॅनडामध्ये विमान अपघातामध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कॅनडामध्ये विमान प्रशिक्षणादरम्यान ही घटना घडली. या अपघातामध्ये तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची माहिती दिली. मनोज शिवकुमार आणि श्रीसरन तिरुज्ञानसंबंधम अशी मृत विद्यार्थ्यांची नाव आहेत. या घटनेनंतर भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

भारतीय दूतावासाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कॅनडामध्ये विमान प्रशिक्षण घेत असताना एका भीषण विमान अपघातात प्राण गमावलेल्या तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील दोन भारतीय विद्यार्थी मनोज शिवकुमार आणि श्रीशरन तिरुज्ञानसंबंथम यांच्या दुःखद निधनाबद्दल व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावास तीव्र शोक व्यक्त करतो. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि प्रियजनांप्रति आमच्या संवेदना कायम आहेत. त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी कुटुंबीयांना सर्वतोपरी दूतावास सहाय्य करण्यास वाणिज्य दूतावास तयार आहे. मृत विद्यार्थ्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ते स्थानिक अधिकारी आणि पीडितांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहेत. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतातील त्यांच्या मूळ राज्यांमध्ये परत पाठवण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी दूतावासीय आणि आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.’ हा अपघात कसा झाला? याबद्दल कोणतीही माहिती उघड झालेली नाही. स्थानिक प्रशासन अपघाताच्या कारणाचा तपास करत आहे.

कॅनेडियन मीडिया सीबीसीने शनिवारी अशाच प्रकारच्या विमान अपघाताची बातमी दिली होती. पण ही घटना तीच होती की नाही याची पडताळणी होऊ शकली नाही. सीबीसीच्या वृत्तानुसार, हार्वेस एअरचे सेसना १७२ विमान स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सस्कॅचेवानमधील किस्बे जवळ कोसळले. ज्यात विमानातील दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला. विमानात दोन परवानाधारक पायलट होते. जे रात्रीच्या वेळी रेजिनाहून सस्कॅचेवानमधील कार्लाइलमार्गे मॅनिटोबातील स्टाइनबॅकपर्यंत विमान चालवत होते.

हार्वेस एअरचे अध्यक्ष ॲडम पेनर यांच्या निवेदनानुसार, त्या दोन्ही पायलटने त्यांच्या व्यावसायिक वैमानिक परवान्यासाठी आवश्यक उड्डाणाचे तास पूर्ण करण्याकरिता हे विमान भाड्याने घेतले होते. सकाळी सुमारे साडेदहा वाजेपर्यंत विमान आपल्या गंतव्यस्थानी न पोहोचल्याने कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाला सांगण्यात आले होते. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. शोध आणि बचाव पथकांना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विमानाचे तुकडे दिसून आले. त्यांना घटनास्थळावर दोघांचे मृतदेह आढळून आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live