Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रसिद्ध व्यावसायिकाची निवासस्थानी आत्महत्या

प्रसिद्ध व्यावसायिकाची निवासस्थानी आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानातील चायवाला स्टार्टअपचे संस्थापक रोहित शर्मा यांनी दौसा येथील निवासस्थानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.

राजस्थान : चायवाला या कंपनीचे संस्थापक रोहित शर्मा यांनी जयपूरच्या दौसा येथील त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहित शर्मा हे साकेत कॉलनीमध्ये राहत होते. शनिवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोस्टमार्टमनंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अमोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रोहित शर्मा यांचे वडील हितेंद्र मोहन शर्मा हे मेडिकल स्टोअर चालवतात, तर त्यांची पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. या दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे. रोहित शर्मा यांनी वयाच्या 17 व्या वर्षी नर्सिंगचे शिक्षण घेत असताना आपल्या व्यावसायाची सुरुवात केली होती. त्यांनी जयपुरमध्ये चायवाला हा स्टार्टअप सुरू केला. दौसा येथे सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता, असे पीटीआयने म्हटले आहे.

जयपूरच्या मानसरोवरमधील शिप्रा पाथ येथे त्यांनी पहिला टी-कॅफे सुरू केला. त्यानंतर शहरात आणखी एक शाखा उघडत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. पुढे त्यांनी विविध शहरांमध्ये 'चायवाला'च्या एकूण सात शाखा सुरू केल्या. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी सर्व आउटलेट्स बंद करून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात ते विविध धार्मिक स्थळांना भेट देताना दिसत होते.

टीप – आत्महत्या करणे हा कोणत्याही अडचणीवर किंवा समस्येवरचा पर्याय नाही. आत्महत्येचा विचार करत असाल तर मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून उपाय शोधू शकता. यासाठी सरकारी हेल्पलाइन नंबर १४४१६ आहे. २४x७ संपर्क साधता येतो. इतर अनेक हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हेल्पलाइन – १८००-५९९-००१९, मुंबई – ०२२- २४१३१२१२ यावर संपर्क करावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live