Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेल्वेतून पडला.. जखमी झाला.. रुग्णालयात भरती केले मात्र..

रेल्वेतून पडला.. जखमी झाला.. रुग्णालयात भरती केले मात्र..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ रेल्वे स्थानकावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, तो तेथून कोणालाही न सांगता निघून गेला. काही तासांनी पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नियतीनेही त्याचा पाठलाग सोडला नाही. उपचारादरम्यान त्याचा काही तासातच मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव मनोज झा (32, रा. जरंगलोई, जि. सुंदरगड, ओडिशा) असे आहे. कामानिमित्त गोवा येथे गेलेले मनोज आणि त्याचा भाऊ सुरेन झा हे दोन ऑगस्ट रोजी रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जात होते. प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर मनोज पाणी घेण्यासाठी खाली उतरला. यावेळी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मनोज कोणालाही काही न सांगता तेथून निघून गेला. जखमी अवस्थेतील रुग्ण अचानक बेपत्ता झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, रात्रीच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात तो आढळून आला. 108 रुग्णवाहिका चालकाने तत्काळ त्याला पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला.

अपघातानंतर मनोजसोबत असलेला त्याचा भाऊ सुरेन झा रेल्वेने पुढे नागपूरपर्यंत गेला होता. मात्र, भाऊ सोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो पुन्हा भुसावळला परतला. आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही मनोजचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याने ही माहिती ओडिशातील नातेवाईकांना कळवली. त्यानंतर नातेवाईक जळगाव येथे दाखल झाले. तोपर्यंत मृतदेहाची रुग्णालयात अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृत व्यक्ती मनोज झा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या घटनेची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत. रेल्वे अपघात, रुग्णाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून बाहेर पडण्यामागील कारण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live