Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे!

संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे!

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदा एल-निनोमुळे राज्यातील काही भागांसह लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, या संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर येथील मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन सोहळ्यात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदनेनंतर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा सुवर्णदिवस आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक लढ्यात लातूरच्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींनी आणि सामान्य जनतेने दिलेले योगदान व त्यांचा त्याग प्रेरणादायी आहे. रझाकार आणि निजाम सैन्याविरुद्ध लातूर जिल्ह्यात औराद, निलंगा, हाडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी यासारख्या विविध ठिकाणी लढाया झाल्या. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार यांनी या लढ्यात सहभाग घेतला. या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांच्या मध्यस्थीने यश मिळाले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलिस ॲक्शन सुरू झाले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवून लातूर जिल्ह्याच्या विकासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

शेतकरी हिताला प्राधान्य देत शासनाने विविध योजना राबविल्या असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६३,१२७ शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचला आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात परतीच्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याने सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. टंचाई काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याचेही नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत सर्वांनीच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान राबवले जाणार असून, या अभियानात सहभागी होवून नागरिकांनी विविध सरकारी सेवा, योजनांचा लाभ घ्यावा. तसेच देशातील युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी १३ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ' चे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून गावागावात स्वच्छतेची नवी चळवळ उभी करावी व आपले गाव स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहन करत लातूरच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने व निष्ठेने प्रयत्न करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live