पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
जामनेर - पहूर रस्त्यावरील शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला अपघात झाल्याची धक्कादायक घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजुला उलटली.
या अपघातात पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेले दोन मजुर बाहेर फेकले जाऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी मृत मजुरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा शालेय पोषण आहार पाचोरा येथून लोड करून नेला जात होता. वाहतुकीदरम्यान दोन्ही मजुर टेम्पोमधील पोषण आहाराच्या गोण्यांवरच बसलेले होते. शेंदुर्णीजवळ अचानक ४०७ वाहनाचे टायर फुटल्याने ते पलटी झाले. आणि दोन्ही कामगार खाली फेकला गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच अंत झाला. या दुर्दैवी घटनेमुळे मयत मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे शासकीय पोषण आहाराच्या वाहतुकीतील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे.
मालवाहू वाहनात कामगारांना गोण्यांवर बसवून नेणे कितपत योग्य होते,श. वाहनाची प्रवासी व माल वाहून नेण्याची क्षमता किती होती ? आणि वाहनाचे फिटनेस, परमिट व विम्याची कागदपत्रे वैध होती का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाचोरा येथून निघालेला हा पोषण आहार नेमका कोणत्या केंद्रासाठी जात होता आणि या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते ? याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. केवळ ‘टायर फुटल्याने अपघात झाला’ एवढ्यावरच हे प्रकरण न थांबवता, या संपूर्ण वाहतूक प्रक्रियेतील नियमभंग आणि दोन कष्टकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच मृतकांच्या वारसांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

