जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, व्हाईस चेअरमन तथा आमदार अमोल पाटील यांनी आज मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेत अनावरण सोहळ्याचे आमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध विषयांवर शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेषतः बँकेचा एनपीए, बँकेची आर्थिक परिस्थिती, आर्थिक व्यवहार, शेतकरी व सभासदांशी संबंधित विविध बाबी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी शरदचंद्र पवार यांनी जिल्ह्यातील शेती व पिकांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी तसेच जिल्ह्यातील एकूण परिस्थिती याबाबत माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सध्याच्या परिस्थितीचा शेती व सहकार क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी आस्थेने विचारणा केली.
आमदार अमोल पाटील यांचे वडील माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रकृतीचीही श्री. पवार यांनी आस्थेने विचारपूस केली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात स्व. अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार, कृषी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

