लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांचा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला आणि नाशिकच्या विभागीय निबंधकांकडे तो अर्ज वैध ठरला.
त्यानंतर या वैध-अवैध अर्जाविरोधात बोलताना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, छाननीमध्ये अर्ज मीच केला आणि आपल्याच विभागीय निबंधकांकडे वैध अर्ज केला, तोही मीच केला. छाननीतील तांत्रिक कारणातून मी तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगून अवैध करायला लावला. त्यानंतर अदृश्य शक्तींच्या जोरावर तो अर्ज अवैध करण्यात आला, असा आरोप सुमित पाटील यांनी केला. त्यानंतर ते अदृश्य हात कोणाचे आहेत, हे मंगेश चव्हाण यांनी स्वतः कबूल केले.
त्यानंतर सुमित पाटील यांनी वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी नको नको त्या भाषेत मंगेश चव्हाण यांचा समाचार घेतला. 'हा मंगेश चव्हाण नामर्द माणूस आहे. त्यांनी निवडणुकीत अधिकाऱ्याला पैसे देऊन माझा अर्ज अवैध केला,' अशा भाषेत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली. आता अर्ज अवैधचा वैध केल्याची कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
तेव्हा सुमित हा लहान आहे. तो काही बोलला तरी तरुण रक्त आहे, त्याचे मी मनावर घेत नाही; पण याबाबत त्यांचे वडील किशोर अप्पा पाटील यांच्याशी मात्र मी बोलणार आहे, असे मंगेश चव्हाण म्हणाले. पण आता एका जाहीर सभेत बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, सुमित पाटील जे बोलला ते योग्यच होते. आधी अवैध आणि नंतर वैध उमेदवारी अर्ज केल्याबद्दल अदृश्य शक्ती कोणाची होती, याची कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
त्यामुळे सुमित जे बोलला ते योग्यच बोलला आहे. फक्त भाषेचा फरक आहे. तरुण रक्त आहे. जे काही बोलला ते मंगेश चव्हाण यांना साजेसे बोलला आहे.
याउपर जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांनी पैसे घेऊन जर सुमितचा उमेदवारी अर्ज अवैध केला, तर त्याला मी सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्या अधिकाऱ्याचा काटा काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्वसामान्यांसाठी साधी माणसं आहोत.
आमच्या वाटेला कोणी गेले, तर आम्ही त्याचे हात छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे किशोर पाटील आपल्या भाषणात म्हणाले. असे वाटले होते की, सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याबाबत अद्वातद्वा बोलल्यानंतर किशोर अप्पा पाटील काहीतरी वेगळी भूमिका घेतील, असे मंगेश चव्हाण यांना वाटले होते. परंतु झाले उलटे. आपला मुलगा नको त्या शब्दांत आमदार मंगेश चव्हाण यांना बोलल्यानंतर त्याच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाहीत, असे वाटले होते; पण इथे नेमके उलटे झाले.
आमदार किशोर पाटील यांनी मुलाच्या वक्तव्याचे समर्थन केले. एकंदरीत, जेव्हा बिनविरोध निवड होण्यासाठी सतीश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता, तोपर्यंत किशोर पाटील हे गिरीश महाजन यांच्याविषयी आदराने बोलत होते. 'आदरणीय आमचे नेते गिरीश महाजन योग्य तो निर्णय घेतील. त्या निर्णयाचे सर्वांनी पालन करायचे आहे,' असे म्हणणारे आमदार किशोर पाटील, एकदा का सतीश शिंदे यांनी अर्ज माघारी घेतला आणि आपला मुलगा सुमित याची बिनविरोध निवड झाली, त्यानंतर त्यांची भाषा बदलली.
आमदार मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी आहेत. गिरीश महाजन यांना विचारल्याशिवाय ते कुठलेही काम करणार नाहीत. त्यामुळे मंगेश चव्हाण यांना किशोर पाटील यांनी बोलले म्हणजे ते गिरीश महाजन यांनाच बोलले, असे होत नाही. काय काही का असेना, सतीश शिंदे यांनी माघार घेतली नसती, तर भाजपातर्फे त्यांची निवडणूक लढवली गेली असती, यात शंका नाही. जरी सुमित पाटील निवडून आले असते, तरी त्याला नाकी नऊ आले असते, हे मात्र निश्चित…

