लोकशाही संपादकीय लेख
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना कै. अजित पवार यांच्या पेक्षाही जास्त मतदान झाले आहे.
सुनेत्रा पवार यांचा 2 लाख 18 हजार मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना अत्यंत नगण्य अशी मते मिळाली आहेत. वास्तविक पाहता सुनेत्रा पवार यांनी सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. ही निवडणूक बिनविरोध होणार होती.
परंतु काही अपक्ष उमेदवारांना उमेदवारांच्या हेकेखोरीपणामुळे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक अशी म्हटली तर बिनविरोधच आहे. सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या निधनामुळे प्रचंड सहानुभूती मिळाली आहे आणि त्यांच्या फायदा त्यांना झाला आहे. तिकडे राहुरी मतदार संघात अक्षय कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांचा पराभव करून विजय प्राप्त केला आहे.
ठरल्याप्रमाणे बारामती मतदारसंघात आणि राहुरी मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडे काही उरलेच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या निधनाने सुनेत्रा पवारांना सहानुभूती मिळाली, ती मिळणे सहाजिकच होते. तिकडे राहुरी मतदार संघात शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना सहानुभूती मिळणार होती ती मिळाली आहे.

