लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. या ठिकाणी गणेशोत्सवाला गालबोट लागलं. गणरायाच्या आगमन मिरवणुकीमध्ये भरधाव कंटेनर घुसला. या अपघातामध्ये कंटेनरने १४ जणांना धडक दिली.
यामधील २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये १२ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट लागले. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत कंटेनर घुसला. मिरवणुकीत घुसलेल्या या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहूजी बनसोडे अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गणपती आगमन मिरवणुकीसाठी गावात तयारी सुरू असताना हा अपघात झाला. मिरवणुकीसाठी रस्त्यावर गर्दी जमलेली असतानाच भरधाव कंटेनर मिरवणुकीत घुसला आणि दुचाकीस्वारांना चिरडत पुढे गेला. अपघातानंतर जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोन्ही मृतांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

