लोकशाही न्यूज नेटवर्क
किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करून जप्त केले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी, दि.
१७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता किनगाव-जळगाव रस्त्यावरील कोळन्हावी चौफुली येथे वन विभागाच्या गस्ती पथकाने संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी टाटा कंपनीचे ७०९ वाहन (क्रमांक एमएच-१८-डी-७४५४) येताना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन घटनास्थळी सोडून लगतच्या केळीच्या बागेत पळ काढला. वन कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही.
त्यानंतर पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे १३ घनमीटर बेकायदेशीर जळाऊ पंचराज लाकूड आढळून आले. या लाकडाच्या वाहतुकीबाबत कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती. वन विभागाच्या पथकाने लाकडासह टाटा ७०९ वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा केले आहे. याप्रकरणी वन गुन्हा क्रमांक २१/२०२६, दि. १७ सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वागझिराचे वनपाल करीत आहेत.
सदर कारवाई उप वनसंरक्षक सौरिष सहाय (यावल वन विभाग, जळगाव), विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर (धुळे) आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील, वनरक्षक सतीश वाघमारे व आय. बी. चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

