सहकार विभागाने बँकांना परत पाठवली यादी
मुंबई : सहकार विभागाकडून साडे पाच लाख शेतकऱ्यांची यादी 4 ते 5 बँकांना परत पाठवण्यात आली आहे. बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या व्याज आकारणीत वाढ करणे, बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणात तफावत दिसणे यामुळे यादी परत पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.
बँकांनी सरकारकडून अतिरिक्त निधी पदरात पाडून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी केल्याचा सहकार विभागाला संशय आहे. शासनाला या चुकीच्या व्याज आकारणीचा कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी सहकार विभागाचे लेखापरीक्षक प्रत्येक खात्याची सखोल तपासणी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
संबंधित शेतकऱ्यांची यादी ही 2 लाखाचा आतील थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आहे. 2 लाखाच्या आतील थकीत तब्बल 21 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. बँकेकडून यादी दुरुस्त करून आल्यानंतर उरलेल्या 5.50 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 2 लाखाच्या आतील एकूण 26 लाख 50 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर 2 लाखावर थकीत असणाऱ्या 2 लाख 90 हजार शेतकऱ्यांना देखील लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली असून, आतापर्यंत विविध टप्प्यांत लाभार्थींच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, पुढील टप्प्यातील सुमारे पाच ते साडेपाच लाख लाभार्थ्यांच्या यादीत मुख्यतः व्यापारी बँकांशी संबंधित शेतकरी आहेत. या बँकांनी सादर केलेल्या डेटाची सहकार खात्याकडील उपलब्ध आकडेवारीशी तुलना केली असता, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष थकबाकी आणि बँकांनी दाखवलेली थकबाकी यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दुष्काळग्रस्त जिल्ह्याची किंवा भागाची शासनाकडून अद्याप कुठलीही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी कुठल्याही बनावट यादीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. तर बनावट यादी तयार करून पसरवणाऱ्या वर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी तयार करून ती व्हायरल करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशी यादी कुणीही पसरवू नये कारण हा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ आहे, राज्य सरकारकडून अद्याप दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची कुठलीही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही.

