लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
भारतीय हवामान विभागाने आज (ता. २६) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरात रात्री पासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून आज ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरु राहील.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींसह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांसाठीही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

