Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यावल नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई नियमानुसारच!

यावल नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई नियमानुसारच!

यावल

यावल नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने अतिक्रमण काढण्याबाबत संबंधितांना प्रशासनामार्फत जाहीर नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार काढण्यात आली असून प्रोटोकॉलनुसार त्यावर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची नावे नमूद करण्यात आली होती.

नोटीस प्रसिद्ध झाली त्यावेळी आपण व आपले कुटुंब नाशिक येथे असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी सांगितले.

नाशिकहून यावल येथे परतल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यानंतर आपण स्वतः तहसीलदारांची भेट घेतली. हा विषय संबंधित विभागाच्या प्रशासनाशी निगडित असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतर अतिक्रमणधारकांसह पोलीस निरीक्षक धारबडे यांची भेट घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले.

त्यानुसार दुपारी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. सध्या पोळा सण आणि त्यानंतर गणेशोत्सव असल्याने पोलीस प्रशासनावर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण असतो. सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी २५ सप्टेंबरनंतर अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती छाया अतुल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९, १८० आणि १८३ अन्वये नगरपरिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ किंवा खुल्या जागेवर केलेले तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अतिक्रमण निष्कासित करण्याचा अधिकार मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी कोणत्याही बाहेरील प्राधिकरणाच्या स्वतंत्र लेखी आदेशाची कायदेशीर आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सदर कारवाई नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयातून करण्यात येणार होती, असे त्यांनी सांगितले.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्यावर अतिक्रमण कारवाईबाबत करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीचा अभ्यास न करता करण्यात आले असल्याचा आरोप छाया अतुल पाटील यांनी केला. रावेर-यावल मतदारसंघातील फैजपूर आणि रावेर या भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. तेथेही नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने सभा अथवा ठराव न करता प्रशासनाच्या नियमानुसार अतिक्रमणे हटविल्याचा दावा त्यांनी केला.

यावल नगरपालिकेत आपली सत्ता नाही म्हणून यावलसाठी वेगळे नियम लागू होत नाहीत, हे आमदारांनी लक्षात घ्यावे, असे छाया अतुल पाटील यांनी म्हटले. प्रशासनाची कारवाई नियमांनुसारच होत असल्याचे सांगत केवळ राजकीय श्रेयासाठी प्रशासनाच्या कामाचे राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या नऊ महिन्यांपासून यावल शहरात एखादे चांगले काम झाले तर त्याचे श्रेय आमदारांनी घ्यायचे आणि काही अडचण निर्माण झाली तर त्याचे खापर अतुल पाटील यांच्यावर फोडायचे, अशी भूमिका काही जण घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एसटीपीची जागा, आदिवासी वसतिगृहाची जागा आणि जलशुद्धीकरण केंद्राची जागा अशा कामांशी कोणताही संबंध नसताना श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र योग्य वेळी संबंधित कागदपत्रांसह वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण कारवाईच्या प्रक्रियेत अतिक्रमणधारकांनी महायुतीच्या कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्याशी संपर्क न साधता थेट नगरपालिका प्रशासनाकडे आपली बाजू मांडली आणि प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात आला, असे छाया अतुल पाटील यांनी सांगितले. त्यामुळे काही राजकीय मंडळींचा तीळपापड झालेला दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावल शहराच्या हितासाठी प्रशासनाने कायदेशीर आणि नियमानुसार केलेल्या प्रत्येक कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेऊन जनतेसमोर सत्य मांडावे, एवढीच अपेक्षा असल्याचे छाया अतुल पाटील यांनी शेवटी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live