Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यात गुटखा, हातभट्टीची पन्नी दारू आणि सट्टा-मटका या तिहेरी अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, याबाबत पहिली बातमी प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

उलट हे धंदे आता अधिकच बिनधास्त आणि बोकाळलेले दिसत असून यामुळे तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाच्या खोल गर्तेत लोटली जात आहे. यावल, फैजपूर, किनगाव, साकळी, हिंगोणा या संपूर्ण परिसरात सध्या हिच परिस्थिती असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही यावल तालुक्यातील प्रत्येक पानटपरीवर विमल, गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू अगदी दहा ते वीस रुपयात मृत्यूची पुडी म्हणून खुलेआम विकली जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांच्या अगदी समोरच हा माल विकला जात असल्याने पंधरा सोळा वर्षांची कोवळी मुले देखील या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. परिणामी तालुक्यात कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे वैद्यकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

दुसरीकडे तापी नदीच्या काठावर आणि दुर्गम शेतशिवारात हातभट्टीच्या विषारी पन्नी दारूच्या भट्ट्या दिवसाढवळ्या धगधगत आहेत. घातक केमिकलपासून बनवलेली ही वीस रुपयांची पन्नी प्यायल्याने अनेक तरुणांचे यकृत निकामी झाले असून अनेक जण कायमचे अपंगत्व घेऊन अंथरुणाला खिळले आहेत. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा मजूर आपली सर्व कमाई या दारूत घालवत असल्याने अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. यामुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्याला सर्वात जास्त पोखरले आहे ते ऑनलाईन सट्टा-मटक्याने. यावल आणि फैजपूर शहरासह ग्रामीण भागात कल्याण, मिलन, राजधानी आणि मेन बाजारच्या नावाने मोबाईलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्रास आकडे घेतले जात आहेत. गावागावात यासाठी एजंट नेमलेले असून दिवसभर काबाडकष्ट करून कमावलेले पैसे तरुण वर्ग एका मिनिटात या सट्ट्यात घालवत आहे. यात हरल्यामुळे अनेक तरुण सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात अडकले असून नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत.

इतके मोठे अवैध धंदे पोलीसांच्या नजरेसमोर कसे चालतात असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. या धंद्यांना दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याने आणि त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने स्थानिक पातळीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची उघड चर्चा आता चावडी-चौकात रंगू लागली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील सुज्ञ नागरिक, महिला मंडळे आणि युवक मंडळांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे मागणी केली आहे की, यावल तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर स्थानिक पोलिसांऐवजी जिल्हा अधीक्षकांच्या विशेष पथकाने थेट धाडी टाकून कठोर कारवाई करावी, शाळा महाविद्यालय परिसरात व्यसन विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत आणि या धंद्यांना अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. पुढील सात दिवसात यावल तालुका या अवैध धंद्यांपासून मुक्त झाला नाही तर महिला आणि युवकांना सोबत घेऊन यावल पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live