Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यसेवा निकालाचा 'गुणांकीत' घोळ? कटऑफवरही संशय ! - MPSC Civil Services Main Exam Update

राज्यसेवा निकालाचा 'गुणांकीत' घोळ? कटऑफवरही संशय ! - MPSC Civil Services Main Exam Update

MPSC Civil Services Main Exam Update

हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या प्रकरणानंतर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालातील मूल्यांकन प्रक्रियेबाबतही उमेदवारांकडून गंभीर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत.

एका उमेदवाराला एका पेपरमध्ये अत्यंत समाधानकारक गुण मिळाले असताना दुसऱ्या पेपरमध्ये अत्यल्प गुण देण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. यासोबतच परीक्षेच्या कटऑफबाबतही संशय व्यक्त केला जात असून, संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. परिणामी, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मूल्यांकन प्रक्रियेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून उमेदवारांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली असून, गुणांकन प्रक्रियेतील कथित विसंगतींची चौकशी करण्याची मागणी आता तीव्र होत आहे. गुरुवारी काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी तसेच नागपूर येथील सहसचिव कार्यालयात निवेदन सादर करून निकालातील गुणांकनाबाबत गंभीर आक्षेप नोंदविले. निवेदनानुसार, निबंध (Essay), सामान्य अध्ययन (General Studies), पर्यायी विषय तसेच मराठी व इंग्रजी या पात्रता विषयांच्या गुणांमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत मोठी तफावत आढळून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काही उमेदवारांना निबंध व सामान्य अध्ययन विषयांमध्ये अत्यल्प गुण मिळाले असताना, काही उमेदवारांना तुलनेने अत्यंत जास्त गुण मिळाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सामान्य अध्ययनाच्या विविध पेपरमध्ये काही उमेदवारांना अत्यल्प गुण मिळाले, तर काही उमेदवारांना तब्बल ११० पर्यंत गुण मिळाल्याची उदाहरणे देण्यात आली आहेत. तसेच, पर्यायी विषयाच्या पेपर-१ व पेपर-२ मधील गुणांमध्येही काही उमेदवारांच्या बाबतीत लक्षणीय तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, माहितीच्या अधिकाराअंतर्गत (RTI) मागविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणांकनातून काही उमेदवारांना विशिष्ट विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आल्याने, या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालाची सखोल पुनर्तपासणी करून आवश्यक असल्यास सुधारित निकाल पुन्हा जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांकडेही निवेदन सादर करण्यात आले असून, आयोग या आक्षेपांवर काय भूमिका घेतो, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५च्या मुलाखतींच्या सुधारित वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून, उमेदवारांना नव्या तारखांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव पूर्वनियोजित मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या असून, आता २१ ते २४ सप्टेंबर तसेच २६ व २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. संबंधित उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालानंतर उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२५ च्या लेखी परीक्षेचा निकाल २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना आता त्यांच्या परीक्षेतील गुण उमेदवारांच्या खात्यातील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील 'View' पर्यायामध्ये पाहता येणार आहेत. दरम्यान, आपल्या गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५ आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार होती. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी संबंधित परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडे विनंती केली होती. उमेदवारांच्या विनंतीचा विचार करून आयोगाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा आता ५ एप्रिल ते २ मेदरम्यान होणार आहे. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक:
५ एप्रिल : भाषा (पेपर एक) आणि भाषा (पेपर दोन)
१८ एप्रिल : निबंध (पेपर तीन)
१९ एप्रिल : सामान्य अध्ययन-१
(पेपर चार) व सामान्य अध्ययन- २ (पेपर पाच)
२६ एप्रिल : सामान्य अध्ययन-३ (पेपर सहा) व सामान्य अध्ययन-४ (पेपर सात)
२ मे : वैकल्पिक विषय (पेपर आठ), वैकल्पिक विषय (पेपर नऊ)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti