NEET Exam Update
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-यूजी परीक्षा पुढील वर्षापासून म्हणजेच २०२७ पासून पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकाधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) ने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
केंद्र सरकारशी सल्लामसलत करून हा बदल अमलात आणला जाईल, असेही स्पष्ट केले.
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एनटीएने न्यायालयात ही माहिती दिली. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा, न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनटीएने म्हटले आहे की, उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने (एचएलसीइ) नीट-यूजी परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याची शिफारस केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, एनटीएच्या प्रमुख परीक्षांपैकी केवळ नीट-यूजी २०२६ ही परीक्षा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) धोरणानुसार पेन-पेपर पद्धतीने घेण्यात आली होती. एनटीएच्या इतर सर्व महत्त्वाच्या परीक्षा आधीच सीबीटी पद्धतीने घेतल्या जात आहेत. उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने नीट यूजी परीक्षा सीबीटी पद्धतीत रूपांतरित करण्याची शिफारस केली असून, संकल्पनाही सुचविली आहे.
या आहेत भविष्यातील उपाययोजना
प्रश्नपत्रिका तयार करणारे, परीक्षक, अनुवादक, प्रूफरीडर आदी संवेदनशील जबाबदाऱ्यांमध्ये निवड पद्धती आणि फेरबदल धोरण अधिक प्रभावीपणे लागू केले जाईल. तसेच, किमान ८५ टक्के भाषांतर प्रक्रियेसाठी एआय आधारित साधनांचा वापर होईल.
‘सीट मॅट्रिक्स विस्कळीत होणार नाही’
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील जागांचे वाटप (सीट मॅट्रिक्स) विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन वेळेत पार पाडण्याचे निर्देश समितीने अधिकाऱ्यांना दिले असे सूत्रांनी सांगितले
पेपर फुटू नये यासाठी उपाययोजना
नवी दिल्ली: नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनी संसदीय समितीला तपासातील प्रगतीची माहिती दिली. तसेच २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठीच्या उपाययोजनांची माहितीही मांडली.
NEET Exam Update
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या शुल्क परताव्यासाठी उमेदवारांनी बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत २२ जूनपर्यंत वाढवली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि ती पुन्हा घेतली जाणार आहे. आतापर्यंत सुमारे १३ लाख उमेदवारांनी बँक खात्याचे तपशील अद्ययावत केले आहेत.
एनटीएने स्पष्ट केले होते की, नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
