Friday, 25 Oct, 7.32 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
४ वर्ष टीम इंडियाबाहेर असलेला संजू सॅमसन म्हणतो..

पुढील महिन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी काल भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी केरळचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने भारतीय संघात जवळ जवळ 4 वर्षांनी पुनरागमन केले आहे.

तो भारताकडून याआधी 19 वर्षांचा असताना 19 जुलै 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध एकमेव टी20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तब्बल 4 वर्षे लागली.

या 4 वर्षांमध्ये त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. त्याला मधे केरळ संघातूनही वगळण्यात आले होते. तसेच तो फिटनेसच्या बाबतीतही संघर्ष करत होता. पण या सर्व गोष्टींवर मात करत त्याने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.

त्याच्या संघर्षाबद्दल त्याने पीटीआयला सांगितले की 'तुम्ही बरोबर म्हणालात ही माझ्यासाठी रोलर - कोस्टर राईड(चढ-उतार) होती. जर तुमच्याकडे खूप सुरक्षित आणि सोपं करीअर असेल तर तिथे तुम्हाला खूप थोड्या गोष्टी शिकायला मिळतील.'

'मी गेल्या 4 ते 5 वर्षात खूप काही शिकलो आहे. जर तुम्हाला खूप वेळा अपयश आले असेल तेव्हा तुम्हाला समजते की कशाप्रकारे ऊठायचे आणि यश कसे मिळवायचे. मी माझ्या आयुष्यात खूप वेळा अपयशी झालो आहे. आता मला समजले आहे की कसे ऊठायचे आणि कशी कामगिरी करायची आहे.'

त्याचबरोबर नुकतेच काही दिवसांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये नाबाद 212 धावांची खेळी करणारा सॅमसन म्हणाला, 'मला कशाचाही पश्चाताप नाही. मी आधीही म्हणल्याप्रमाणे अनेक चढ-उतारातून गेलो आहे. मी माझ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या की मी आधीपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली पाहिजे.'

'मी याआधीच संघात यायला हवे होते. पण उशीरा का होईना मला हे समजले की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि तूमची वेळ येईपर्यंत तूम्ही सयंम ठेवला पाहिजे. मी तेच केले आणि या प्रक्रियेमध्ये मी एक चांगला व्यक्ती झालो.'

'मी माझ्या कठीण कालावधीचीही मजा घेतली. मला या काळात मला खरंच साथ देणारे कोण आहेत हे कळाले.'

तसेच फलंदाज म्हणून असणाऱ्या मानसिकतेबद्दल सॅमसन म्हणाला, 'मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या मागील 5 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. मी माझा खेळ जास्त चांगला ओळखू शकलो. मी एक व्यक्ती म्हणूनही मला ओळखू लागलो.'

'मी माझ्या सकारात्मक गोष्टींवर काम केले आणि मी परिपूर्ण फलंदाज बनण्याचा प्रयत्न केला नाही, जो मी बऱ्याच काळापासून करत होतो. मला समजले की कोणीही परिपूर्ण फलंदाज असू शकत नाही. आता मी सर्व गोष्टी सर्वसाधारण ठेवतो आणि माझ्या क्रिकेटची मजा घेतो.'

तसेच फिटनेसही आता मागील दोन-तीन वर्षापासून नियमितपणे पण चांगला ठेवला असल्याचेही त्याने म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top