Friday, 16 Aug, 3.28 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
आज यावेळी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने सहा अंतिम उमेदवारांची निवड केली आहेत. यामध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री, माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांनी निवड झाली आहे.

या सहा जणांमधून एकाची आज(16 ऑगस्ट) सल्लागार समीती भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली जाणार आहे.

भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे तिघेही पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहतील.

ही घोषणा होण्याआधी प्रशिक्षकपदासाठी अंतिम 6 जणांची निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सल्लागार समीतीसमोर प्रेसेंटेशन सादर करावे लागणार आहे. त्यानंतर सल्लागार समीती मुख्य प्रशिक्षकाची निवड करेल.

भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदासाठी अंतिम 6 उमेदवारांच्या यादीत समावेश असलेले मूडी हे ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू असून त्यांनी आयपीएलमध्ये मागील 6 वर्षे सनरायझर्स हैद्राबाद संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबादने 2016 आयपीएलचे विजेतेपद तसेच 2018 च्या आयपीएलचे उपविजेतेपद मिळवले आहे.

त्याचबरोबर हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच हेसन यांनी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

तसेच राजपूत हे याआधी 2007 च्या टी20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक होते. तसेच त्यांनी झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

सिमन्स 2019 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक होते. त्याचबरोबर त्यांनी झिम्बाब्वे, आयर्लंड संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजने 2016 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

रॉबिन सिंग हे बराच काळ मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते. तसेच 2007-2009 दरम्यान त्यांनी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

तसेच सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे भारतीय संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून 2017 पासून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला आहेत. तसेच वनडेत 60 पैकी 43 सामन्यात तर टी20मधील 36 पैकी 25 सामन्यात भारताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळवला आहे.

तसेच 2019 च्या विश्वचषकात भारताने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. त्याचबरोबर मागीलवर्षी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका विजयही भारतीय संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मिळवला होता.

त्यामुळे आता या 6 जणांपैकी कोण भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार हे आज संध्याकाळी 7 वाजता समजणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top