Monday, 18 Jan, 11.12 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले

गोवा: हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी एससी ईस्ट बंगालने दहा खेळाडूंनिशी खेळावे लागूनही चेन्नईयीन एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले. 31व्या मिनिटालाच अजय छेत्री मैदानाबाहेर गेल्यानंतर तासभर ईस्ट बंगालने आपले क्षेत्र सुरक्षित राखले.

याबरोबरच कोलकात्याच्या या मातब्बर संघाने गेल्या सात सामन्यांतील अपराजित मालिका कायम राखली आहे. या टप्प्यात एफसी गोवाविरुद्ध बरोबरी आणि बेंगळुरू एफसीविरुद्ध विजय अशी कामगिरी ईस्ट बंगालने केली आहे.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धातही सुटू शकली नाही. ईस्ट बंगालने 12 सामन्यांत सहावी बरोबरी साधली असून दोन विजय व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण झाले. त्यांचे 11 संघांमधील नववे स्थान कायम राहिले.

चेन्नईयीनसाठी बाद फेरीच्यादृष्टिने हा निकाल प्रतिकूल ठरला. 12 सामन्यांत त्यांची सहावी बरोबरी असून तीन विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले. पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडचेही 15 गुण आहेत, पण नॉर्थईस्टचा उणे 1 (15-16) गोलफरक चेन्नईयीनच्या उणे दोन पेक्षा (10-12) सरस आहे. आता चेन्नईयीन, नॉर्थईस्ट युनायटेड आणि ईस्ट बंगाल यांच्या प्रत्येकी सहा लढती बरोबरीत सुटल्या आहेत.

मुंबई सिटी एफसी 11 सामन्यांतून 26 गुणांसह आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून 11 सामन्यांत 21 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 12 सामन्यांत 19 गुण आहेत. हैदराबाद एफसी 11 सामन्यांतून 16 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पूर्वार्धातच ईस्ट बंगालला धक्का बसला. त्यांचा एक खेळाडू कमी झाला. मध्यरक्षक अजय छेत्री याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. 22व्या मिनिटाला त्याने चेन्नईयीनचा मध्यरक्षक अनिरुध थापाला पाडले होते. त्यावेळी त्याने खांद्याने धडक दिली होती. नंतर त्याने रेफरी राहुलकुमार गुप्ता यांच्याशी हुज्जतही घातली होती. त्यामुळे त्याच्यावर यलो कार्डची पहिली कारवाई झाली. मग नऊ मिनिटांनी त्याला दुसऱ्या यलो कार्डला सामोरे जावे लागले. यावेळीही त्याने थापाला पाडले. थापाने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविताच अजय छेत्रीने जणू काही रग्बीपटू असल्याप्रमाणे त्याला पाडले. त्यामुळे गुप्ता यांनी खिशातून यलो कार्ड दुसऱ्यांदा फडकावले. परिणामी ईस्ट बंगालचा एक खेळाडू कमी झाला.

या सामन्यात दोन्ही संघांनी काही उल्लेखनीय प्रयत्न केले. पहिल्या सत्रात चेन्नईयीनला 23व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली होती. फ्री किकवर थापाने बॉक्समध्ये चेंडू मारल्यानंतर ईस्ट बंगालची बचाव फळी प्रतिस्पर्धी बचावपटू एली साबिया याची नाकेबंदी करू शकली नाही. साबियाचा पहिला प्रयत्न चुकला, पण त्याला रिबाऊंडवर संधी मिळाली. त्यावेळी त्याने दिलेल्या क्रॉस पासवर बचावपटू इनेस सिपोविच याने उडी घेत प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती.

दुसऱ्या सत्रात 57व्या मिनिटाला चेन्नईयीनचा मध्यरक्षक एडवीन वन्सपॉल याने जेकब सिल्व्हेस्टर याला थ्रो-इनवर बॉक्समध्ये पास दिला. त्यातून स्ट्रायकर इस्माईल गोन्साल्वीस याला संधी मिळाली. इस्माईलने प्रयत्न केला, पण मजुमदार याने चपळाईच्या जोरावर ईस्ट बंगालचे नेट सुरक्षित राखले.

सहा मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनचा बदली मध्यरक्षक फातखुलो फातखुलोएव याला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. त्याच्या क्रॉस शॉटवर छातीने नियंत्रण मिळवित स्ट्रायकर रहीम अली याने बदली स्ट्रायकर जेकब सिल्व्हेस्टर याला पास दिला. जेकबने चेंडू पुन्हा रहीमकडे सोपविला. रहीमने प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती. पण त्याच्या आणि चेन्नईयीनच्या सुदैवाने चेंडू लालियनझुला छांगटे याला मिळाला. मध्यरक्षक छांगटेने दमदार फटका मारला, पण ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार याने डावीकडे झेप टाकत चेंडू अडविला.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालची आज केरला ब्लास्टर्सविरुद्ध लढत

आयएसएल २०२०-२१ : ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीचा एटीके मोहन बागानला शह

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top