Friday, 13 Dec, 6.52 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
आयपीएलच्या लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेल खेळणार या स्पर्धेत.

मानसिक तणावामुळे क्रिकेटपासून विश्रांती घेणारा ऑस्ट्रेलियाचा (Australia) आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल 17 डिसेंबरपासून बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) खेळताना दिसणार आहे.

या बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेल मेलबर्न स्टार्स या संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मेलबर्न स्टार्सचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड हसी (David Hussey) यांनी सांगितले. आयपीएलच्या लिलावापूर्वी मॅक्सवेलचे पुनरागमन (Comeback) होणे ही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या पुनरागमनाच्या बातमीला मेलबर्न स्टार्सचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड हसी यांनी होकार दिला. डेव्हिड हसी म्हणाला, "मॅक्सवेल आमच्या संघाचे नेतृत्व करण्यास तयार आहे याचा आम्हाला फार आनंद झाला आहे," असे डेव्हिड हसी म्हणाले.

"तो एक दिग्गज खेळाडू आहे आणि आमच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला हे महत्वाचे आहे," असेही हसी म्हणाले.

बिग बॅश लीगचा पहिला सामना 17 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) आणि सिडनी थंडर (Sydney Thunder) यांच्यात खेळवला जाणार आहे. यानंतर 18 डिसेंबर रोजी सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) आणि पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) यांच्यात सामना होणार आहे.

रेनेगेड्स (Melbourne Renegades) आणि सिडनी थंडर या संघात 19 डिसेंबर रोजी होईल. तर, 20 डिसेंबर रोजी मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) आणि ब्रिस्बेन हीटचा सामना होईल. या सामन्यात मॅक्सवेल मैदानात उतरणार आहे.

19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलवर मोठी बोली लागू शकते. मॅक्सवेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. गुरुवारी आयपीएल 2020 च्या लिलावासाठी 332 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top