श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने २०२६ च्या आयपीएल हंगामात खेळण्याची परवाणगी मिळावी, यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे. फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) त्याला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नाकारले आहे आणि ते प्रमाणपत्र (एनओसी) जारी करण्याचे आदेश मंडळाला द्यावेत अशी विनंती त्याने कोर्टासमोर केली आहे.
तुषाराने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवाणगी मिळावी, यासाठी कोलंबोच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. आज (२ एप्रिल) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि ९ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. आपल्या याचिकेत थुषाराने एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा, सचिव बंदुला दिसानायके, खजिनदार सुजीवा गोडालियाड्डा आणि सीईओ ऍशले डी सिल्वा यांच्याबाबत प्रतिवाद याचिका केली आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेच्या बोर्डाने स्पष्ट केले होते की, दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या काही खेळाडूंसाठी आवश्यक वाटणाऱ्या फिटनेस चाचण्या घेतल्यानंतरच ते त्यांच्या काही खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देतील, त्यामध्ये तुषाराचाही समावेश आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात तुषाराची निवड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात झाली आहे. तो याआधी २०२४ आणि २०२५ च्या हंगामातही एलएससीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच खेळला होता. आताच्या हंगामासाठी त्याला हे प्रमाणपत्र न देण्यामागे बोर्डाने कारण दिले आहे. त्यांनी सांगितले की तुषारा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने बोर्डाने त्याला एनओसी नाकारला आहे.
तुषाराचा एसएलसीसोबतचा करार ३१ मार्च, २०२६ ला संपला आहे. तो करार न वाढवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत त्याने आधीच बोर्डाला कळवले होते. त्याची राष्ट्रीय संघासाठी निवड होणार नाही, हेदेखील त्याला कळवण्यात आले होते. तो फिट असून त्याला एनओसी न देणे हे अयोग्य आहे, असे मत तुषाराने व्यक्त केले आहे.
तुषारा २०२५ च्या हंगामातही आरसीबीचा भाग राहिला आहे. त्याला फ्रॅंचायजीने १.६ कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि २०२६ साठी रिटेन ठेवले. २०२५ मध्ये त्याने एका सामन्यात खेळताना एक विकेट घेतली होती.

